भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. यादरम्यान, नरेंद्र मोदी यांनी आज व्हाईट हाऊसवर (अमेरिकेच्या अध्यक्षांचं निवासस्थान) जाऊन अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि त्यांच्या पत्नी जिल बायडेन यांची भेट घेतली. अध्यक्ष बायडेन आणि फर्स्ट लेडी स्वतः मोदींच्या स्वागतासाठी हजर होत्या. मोदींना त्यांनी स्नेहभोजनासाठी आमंत्रित केलं होतं. व्हाईट हाऊसमध्ये मोदी आणि बायडेन दाम्पत्याने फोटोसेशनही केलं.
या भेटीनंतर नरेंद्र मोदी यांनी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, व्हाईट हाऊसमध्ये स्नेहभोजनासाठी आमंत्रित केल्याबद्दल मी अध्यक्ष जो बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन यांचे आभार मानतो. या भेटीवेळी आम्ही अनेक विषयांवर बातचित केली. दरम्यान, व्हाईट हाऊस भेटीवेळी मोदी बायडेन दाम्पत्यासाठी काही भेटवस्तू घेऊन गेले होते. या भेटवस्तूंनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडेन यांना ७.५ कॅरेटचा हिरा भेट म्हणून दिला आहे. हा एक ग्रीन डायमंड आहे. तर मोदींनी अध्यक्ष जो बायडेन यांना ‘दृष्टिसहस्त्रचंद्रो’ ही १० वेगवेगळ्या गोष्टी असलेली चंदनाची पेटी भेट म्हणून दिली आहे. ही भेट अशा व्यक्तीला दिली जाते ज्याने एक हजार पौर्णिमा पाहिल्या आहेत. या पेटीत बायडेन यांच्यासाठी एकूण १० भेटवस्तू ठेवण्यात आल्या आहेत.
हे ही वाचा >> “नरेंद्र मोदी जगातील सर्वांत लोकप्रिय नेते का?” न्यू यॉर्क टाईम्समध्ये पंतप्रधानांचं कौतुक
म्हैसूरमधल्या चंदनापासून बनवलेली लाकडी पेटी जी जयपूरमधल्या तज्ज्ञ शिल्पकाराने बनवली आहे. यामध्ये श्री गणेशाची सुबक अशी चांदीची मूर्ती आणि एक पणती आहे. तसेच यात १० भेटवस्तू ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये पंजाबमधलं तूप, राजस्थानमधलं २४ कॅरेट हॉलमार्क केलेलं सोन्याचं नाणं, ९९.४ कॅरेट चांदीचं नाणं, महाराष्ट्राचा गूळ, उत्तराखंडचा तांदूळ, तामिळनाडूतले तीळ, भूदानाचं प्रतीक म्हणून (भूमीचं दान)कर्नाटकातल्या चंदनाचा तुकडा, गोदानाचं (गायीचं दान) प्रतीक म्हणून पश्चिम बंगालमधल्या कारागिरांनी घडवलेला चांदीचा नारळ, झारखंडमधलं हाताने विणलेलं रेशमी कापड, गुजरातमधलं मीठ देण्यात आलं आहे.
