लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया खात्यावरील नावासमोर ‘मोदी का परिवार’ अशी टॅगलाईन देत नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दर्शवण्याचा प्रयत्न केला होता. देवेंद्र फडणवीसांसह भाजपाच्या मोठ्या नेत्यांनीही त्यांच्या नावासमोर ‘मोदी का परिवार’ अशी टॅगलाईन जोडली होती. दरम्यान, आता सोशल मीडिया खात्याच्या नावासमोरील मोदी का परिवार ही टॅगलाईन हटवा, अशी विनंती पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – “प्रियंका गांधींनी वाराणसीतून निवडणूक लढवली असती तर…”; राहुल गांधींचा मोठा दावा!

नेमकं काय म्हणाले नरेंद्र मोदी?

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भारतातील जनतेने माझ्याबद्दल आपुलकी दाखवत त्यांच्या सोशल मीडियावर खात्यावरील नावासमोर ‘मोदी का परिवार’ अशी टॅगलाईन जोडली होती. त्यातून मला खूप पाठबळ मिळालं. देशातील जनतेने तिसऱ्यांना एनडीएला बहुमत देत विजयी केलं. तसेच जनतेची सेवा करण्याची संधी दिली. आपण सर्व एक कुटुंब आहोत, हा संदेश प्रभावीपणे पोहोचल्याबद्दल मी आभार मानतो. तसेच आता ‘मोदी का परिवार’ ही टॅगलाईन हटवण्याची विनंती करतो, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

तसेच सोशल मीडिया खात्यावरील नावासमोरून ‘मोदी का परिवार’ ही टॅगलाईन हटवली तरी आपल्यातील ऋणानुबंध कायम राहतील. भारताच्या प्रगतीसाठी झटणारा अतूट असा आपला परिवार आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

हेही वाचा – “दुसऱ्यांच्या घरातल्या खुर्च्या उधार घेऊन..”, मल्लिकार्जुन खरगेंची पंतप्रधान मोदींवर टीका

नावापुढे ही टॅगलाईन जोडण्याची सुरुवात कशी झाली?

पटना येथे ३ मार्च रोजी महागठबंधनच्या रॅलीत लालूप्रसाद यादव यांनी मोदींवर निशाणा साधला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी घराणेशाहीवर टीका करतात, पण त्यांना स्वतःचं कुटुंब का नाहीय? असा तिखट प्रश्न लालू प्रसाद यादव यांनी विचारला होता. या प्रश्नाचं उत्तर भाजपाने एक्सवरून दिलं होतं. सर्वांशी आत्मियता आणि सर्वांशी काळजी, म्हणूनच १४० कोटी देशवासी पंतप्रधान मोदींचं कुटुंब आहे, असा पलटवार भाजपाने केला होता. यानंतर भाजपाच्या नेत्यांनी सोशल मीडियावरील खात्यावर मोदी का परिवार असं लिहिण्यास सुरुवात केली होती.