police constable used car number to reach woman influencer Instagram DMs Video : पोलीस हे सामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी असतात आणि त्यांना जी आधुनिक यंत्र दिली जातात ती देखील लोकांचे प्रश्न सोडवले जावेत यासाठी असतात. मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये एका महिलेने गुडगाव पोलिसांच्या पीसीआर वाहनात बसलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. या व्हिडीओची सध्या जोरदार चर्चा होत आहे. या महिलेने आरोप केला आहे की एका पोलीस कर्मचाऱ्याने तिचा पाठलाग करत आणि गाडीच्या नंबरवरून तिचे नाव शोधून काढल्याचा आरोप केला आहे.

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर शिवांगी पेशवानी यांनी सुमारे तीन मिनीटांच्या व्हिडीओमध्ये त्यांच्याबरोबर नेमकं काय झालं याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

नेमकं काय झालं?

गुडगाव येथे झालेल्या घटनेबद्दल माहिती देताना शिवांगी यांनी सांगितलं की, १४ सप्टेंबरच्या रात्री जवळपास १२ वाजता त्या गाडी चालवत परत येत होत्या. जेव्हा त्या घरी पोहचल्या तेव्हा त्यांच्या रीलवर सिमरन चोपडा नावाच्या आयडीवरून कमेंट करत विचारले की, तुम्ही त्याच व्यक्ती आहात का ज्या १५ मिनिटांपूर्वी आरडी सिटीच्या गेट ३ मधून निघून सेक्टर ४५ मध्ये गेल्या होतात? तुमच्या टाटा पंच कारमधून?

ही कमेंट वाचून शिवांगी यांनी त्यांची कोणीतरी फॉलोअर असेल असे वाटून रिप्लाय केला आणि विचारले की इतक्या रात्री तुम्ही मला कसे ओळखले? तेव्हा तो रिप्लाय देक म्हणाला की, पोलिसांची नजर खूप तीक्ष्ण असते शिवांगीजी, DM (डायरेक्ट मेसेजवर) मध्ये बोलूयात का? ही कमेंट वाचून शिवांगी यांना धक्का बसला आणि त्यांना आठवते की त्या येत असताना एक पीसीआर वाहन त्यांच्या मागे पुढे फिरत होते. त्यानंतर त्यांनी कमेंट करण्याचे कारण विचारले.

तेव्हा तो सांगतो की त्याने शिवांगी यांच्या गाडीच्या नंबरवरून त्यांचे नाव माहिती करून घेतले आणि नंतर इन्स्टाग्राम आयडी शोधून त्यांच्या पोस्टवर कमेंट केली. कारण मेसेज करण्याचा पर्याय दाखवत नव्हता. व्हिडिओमध्ये त्या म्हणाल्या की, ‘मला धक्का बसला. सरकारने आमच्या सुरक्षेसाठी नियुक्त केलेला पीसीआर अधिकारी माझ्या लाईव्ह हालचालींवर लक्ष कसे ठेवू शकतो आणि मला असे मेसेज कसे पाठवू शकतो?’

इनबॉक्समध्ये तो पोलीस कर्मचारी त्यांना म्हणतो की, तुम्ही खूप सुंदर आहात, तुमचे वय इतके वाटत नाही, तुम्ही माझ्याशी मैत्री करा. या घटनेनंतर शिवांगी यांनी गुडगावच्या सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आणि सर्व स्क्रीनशॉट तेथे सादर केले.

शिवांगी यांनी पुढे व्हिडीओमध्ये सांगितलं की, सायबर क्राइम पोलिसांनी त्या पोलीसाचा शोध घेतला. त्यानंतर एसएचओच्या समोर दोघांना बोलवण्यात आले आणि तेथे एसएचओ आणि त्यांच्या खालचा एक अधिकारी त्यांना म्हणाले की, ‘मॅडम तो असं काय बोललो, जे तुम्ही इतक्या नाराज होत आहात, मैत्री करण्याची इच्छाच तर व्यक्त केली, त्याचा कुठला वाईट उद्देश थोडी होता, मैत्री करायची नाही तर ब्लॉक करा आणि पुढे जा.’

पोलिसांचे हे बोलणे ऐकून त्यांना पुन्हा एकदा धक्का बसल्याचे शिवांगी व्हिडीओमध्ये सांगतात. व्हिडीओच्या शेवटी त्या म्हणतात की, ‘मी ५० वर्षांची होणार आहे आणि मला अशा गोष्टी अनुभवाव्या लागत असतील तर माझ्याहून कमी वयाच्या आहेत त्यांचे काय हाल होत असतील. मी त्या पोलीसाविरोधात तक्रार केली आहे आणि मी त्याला शिक्षा मिळवून दिल्याशीवाय सोडणार नाही.’

इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करताना, @shiwangi_peswani ने “हे फक्त अंगावर काटा आणणारेच नाही तर धोकादायक आहे असं शीर्षक देत एक मोठं कॅप्शन लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या घटनेचे वर्णन केले आहे. या रीलला ३७,६००० हून अधिक लाईक्स आणि २ हजारांहून अधिक कमेंट्स मिळाल्या आहेत. लोक या घटनेवर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी शिवांगी याच्या धाडसाचे कौतुक केले आहे. तर अनेकांनी पोलीसांच्या वर्तवणुकीवर संताप व्यक्त केला आहे