Pakistan Blast : पाकिस्तान पुन्हा एकदा स्फोटाने हादरलं आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान राज्यातील क्वेटा शहरातील लष्करी मुख्यालयाजवळ मंगळवारी मोठा शक्तिशाली स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या शक्तिशाली स्फोटामध्ये तब्बल १० जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक गंभीर झाले आहेत. या स्फोटाच्या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये स्फोट झाल्यानंतर संपूर्ण परिसरात प्रचंड आगीच्या आगीच्या ज्वाळा पसरल्याचं दिसून येत आहे.

हा स्फोट एवढा भीषण होता की क्वेटा शहरात आणि परिसरात मोठा आवाज झाला आणि एकच खळबळ उडाली. ज्या ठिकाणी हा स्फोट झाला, तेथील जवळच्या घरांच्या आणि इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. तसेच या घटनेत आतापर्यंत समोर आलेल्या वृत्तानुसार १० जणांचा मृत्यू झाला असून ३२ पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. तसेच मृतांची संख्या आणखी वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. या संदर्भातील वृत्त पाकिस्तानी माध्यमांच्या हवाल्याने एनडीटीव्हीने दिलं आहे.

क्वेटा शहरातील झरघुन रोडवरील एफसी (फ्रंटियर कॉन्स्टेब्युलरी) मुख्यालयाच्या कोपऱ्यावर हा बॉम्बस्फोट झाला आहे. या घटनेनंतर रुग्णालयांमध्ये वैद्यकीय आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. तसेच जे जखमी झाले आहेत, त्यांच्यावर तातडीने रुग्णालयांत उपचार सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान, स्फोटाची घटना घडल्यानंतर क्वेटा शहरात रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

दरम्यान, स्फोट झाल्यानंतर स्थानिक प्रशासनाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते आणि मदत कार्य सुरू होतं. तसेच ही घटना नेमकं कशामुळे घडली? या पाठिमागे कोणी आहे का? या संदर्भातील शोध मोहीम पोलिसांनी सुरू केली असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

सोशल मीडियावरील व्हिडीओमध्ये काय?

स्फोट झाल्याच्या संदर्भातील सोशल मीडियावर एक सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका वर्दळीच्या रस्त्यावर एक भीषण स्फोट झाल्याचं दिसून येत आहे. या घटनेत मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे.