राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर सध्या सोशल मीडियावर ट्रेडिंग आहेत. ज्येष्ठ पत्रकार करण थापर यांनी घेतलेली त्यांची मुलाखत चांगलीच चर्चेत राहिली. प्रशांत किशोर यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं गेलं. यावरून त्यांनी आता त्यांच्या विरोधक आणि ट्रोलर्सला प्रत्युत्तर दिलं आहे.

२०२२ च्या हिमाचल प्रदेश निवडणुकीत काँग्रेसचा पराभव होईल, असा अंदाज प्रशांत किशोर यांनी त्यावेळी वर्तवला होता. याबाबतच करण थापर यांनी या मुलाखतीत विचारलं. या प्रश्नावरून प्रशांत किशोर संतापले. मी असा अंदाज वर्तवला होता याचा व्हिडिओ दाखवा, असं प्रशांत किशोर म्हणाले. त्यावेळी करण थापर यांनी त्यांच्या अशा वक्तव्याचे प्रसिद्ध झालेले वृत्त दाखवले. परंतु, वर्तमानपत्रात काहीही छापून येऊ शकतं, असं सांगत माझ्या या वक्तव्याचा व्हिडिओ दाखवा यावर ते ठाम राहिले. तसंच, मी जर असा अंदाज वर्तवला असेन तर मी माझं काम सोडून देईन. पण तुम्ही माझ्याबाबत केलेले सिद्ध करण्यास अपयशी ठरलात तर तुम्ही जाहीरपणे माफी मागावी, असंही किशोर मुलाखतीत म्हणाले.

करण थापर यांनी याआधीही अनेकदा प्रशांत किशोर यांची मुलाखत घेतली आहे. परंतु, ही मुलाखत सोशल मीडियावर अधिक चर्चिली गेली. प्रशांत किशोर पुढे म्हणाले की “मी काही बोललो आणि मुलाखतीतून बाहेर पडलो असं बोलायची मी संधी देणार नाही. मी तुमच्यासारख्या इतर चारजणांबरोबरही सामोरं जाऊ शकतो. मी जे बोलतोय त्यावर तुमचा विश्वास नसेल तर मग तुम्ही माझी मुलाखत का घेत आहात?”

पाणी पिणं सोशल मीडियावर व्हायरल

या मुलाखतीत ते पाणी पितानाही दिसत आहे. त्यांच्या या कृतीची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करण थापर यांना दिलेल्या मुलाखतीशी केली जातेय. पंतप्रधान नरेंद्र मोदीही करण थापर यांच्या मुलाखतीत पाणी प्यायले होते. तसंच कॅमेरामनकडे बोट दाखवून मुलाखत थांबवण्याची सूचना केली होती. प्रशांत किशोर यांची पाणी पिण्याची कृतीही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मोदी आणि किशोर यांचे फोटो एकत्र करून त्यांच्यावर टीका केली जातेय. या टीकेला प्रशांत किशोर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये ते म्हणतात की, “पाणी पिणे चांगले आहे. कारण ते मन आणि शरीर दोन्ही हायड्रेटेड ठेवते. या निवडणुकीच्या निकालाबाबत माझ्या अंजादावर टीका केली त्यांनी ४ जून रोजी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे.

हेही वाचा >> Pune Porsche Accident: “माझ्या मुलाची हत्या करणाऱ्या त्या मुलाला…”, अनिशच्या आईची संतप्त प्रतिक्रिया

याच पोस्टमध्ये त्यांनी एक टीपही दिली आहे. ते म्हणाले, “PS: लक्षात ठेवा, ०२ मे २०२१ आणि #पश्चिम बंगाल!!”

दरम्यान, नरेंद्र मोदींच्या २०१४ च्या प्रचाराची धुरा सांभाळणारे किशोर यांनी इंडिया टुडेला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले की पंतप्रधान मोदींच्या विरोधात कोणताही राग नाही आणि भाजप ३०३ च्या जवळपास जागा जिंकेल.