पीटीआय, पाली (राजस्थान)
मद्यपी वडील, त्यांचेही छत्र लवकरच हरपले, गरिबी आणि अर्धवट शिक्षण अशा सर्व संकटांचा सामना करत सात गावांच्या सरपंचपदापर्यंत प्रवास करणाऱ्या पाली जिल्ह्यातील सकदरा गावातील प्रवीणा यांची प्रेरक यशोगाथा राजस्थानातील अनेक मुलींना प्रेरणा देत आहे.
प्रवीणा यांचे पितृछत्र हरपल्याने आणि गरिबीमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागले. उदरनिर्वाहासाठी दुसऱ्यांचे पशुपालन करावे लागले. पुरुषप्रधान समाजातील सर्व आव्हानांशी दोन हात करून त्या वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी पाली जिल्ह्यातील सात गावांच्या सरपंच झाल्या. २०१४ ते २०१९ या कालावधीत रूपवास, केरळ, मुलियावास, रौनगर, सेवरा की ढाणी, मूलाजी की ढाणी आणि नारूजी की ढाणी या सात गावच्या सरपंच होत्या. आता त्या मुलींच्या शिक्षणासाठी काम करत आहेत.
हेही वाचा >>>पतीने केलेला बलात्कारही बलात्कारच, उच्च न्यायालयाने व्यक्त केलं परखड मत
प्रवीणा आता आत्मविश्वासाने जगत असल्या तरी एक काळ असा होता की त्यांच्या आयुष्यात निराशा, गरिबी, मद्यपी वडील, चार लहान भावंडांची जबाबदारी आणि बालविवाहाचा धोका अशी अनेक संकटे होती. पण, सकदरा गावापासून ४० किलोमीटरवर असलेल्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाने त्यांचे भविष्य बदलले. या शाळेत वंचित गटातील मुलींसाठी विशेष उपक्रम राबवले जात होते. ‘एज्युकेट गर्ल्स’ नावाच्या स्वयंसेवी संस्थेच्या (एनजीओ) कार्यकर्त्यांनी लहानग्या प्रवीणाला निवासी शाळेत पाठवण्याची विनंती केली. या शाळेमुळे प्रवीणा यांचा जीवनाकडे पाहण्याचा केवळ दृष्टिकोनच बदलला नाही तर मुलींसाठी शालेय शिक्षणाचे महत्त्वही समजले.
प्रवीणा यांनी सांगितले की, ‘‘लहान वयात लग्न झाले असते तर माझे जीवन वाया गेले असते. त्यानंतर मी माझे उर्वरित आयुष्य पशुपालन आणि घरातील कामे करण्यात घालवले असते. पण मला योग्य वेळी योग्य मार्ग मिळाला. आता मला शाळेत न जाणारी मुलगी भेटली की तिलाही योग्य मार्गदर्शन करते. तिच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते.’’ महत्त्वाचे म्हणजे यामध्ये त्यांना सासरचाही पाठिंबा आहे.
शालेय शिक्षणानंतर वयाच्या १८ व्या वर्षी त्यांचा विवाह एका मजुराशी झाला. सासरच्या घरातील सर्वात सुशिक्षित त्याच आहेत. त्यामुळे त्यांना सरपंचपदाची निवडणूक लढवण्याची प्रेरणा मिळाली. सरपंचपदी निवड झाल्यानंतर शिक्षणासाठी जास्तीत जास्त आर्थिक तरतूद केली जाईल याची काळजी घेतल्याचे त्यांनी सांगितले.