पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी श्रीनगर येथे बोलताना मोठी घोषणा केली. लवकरच राज्यात विधानसभा निवडणुका घेण्यासंदर्भात तयारी केली जात असल्याचे सुतोवाच त्यांनी केले. केंद्रशासित प्रदेशात आता लवकरच स्वतःचे सरकार स्थापन होऊ शकते, असेही ते म्हणाले. तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर मोदींचा हा काश्मीरमधील पहिलाच दौरा आहे. दोन दिवसांच्या दौऱ्यातील पहिल्या दिवशी त्यांनी शेर-ए-काश्मीर आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स सेंटर (SKICC) या संमेलनाला संबोधित केले. यावेळी त्यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये अलीकडे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचाही उल्लेख केला. शांततेच्या विरोधी शत्रूंना धडा शिकवला जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, राज्यात विधानसभा निवडणुका घेण्याची तयारी सुरू झाली आहे तो दिवस आता दूर नाही, जेव्हा राज्यातील लोक स्वतःचे सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तसेच तो दिवसही आता दूर नाही, जेव्हा जम्मू आणि काश्मीर राज्य म्हणून स्वतःचे भविष्य ठरवेल.

पंतप्रधान मोदी गुरुवारी संध्याकाळी श्रीनगरमध्ये दाखल झाले. सर्वात आधी त्यांनी SKICC च्या संमेलनातील प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी विविध स्टार्टअप्सनी लावलेले स्टॉलची पाहणी केली. त्यानंतर पायाभूत सुविधा, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राशी संबंधित १५०० कोटींच्या ८४ प्रकल्पांचे भूमीपूजन पंतप्रधान मोदींनी केले. तसेच विविध सरकारी विभागात नोकरी मिळालेल्या २००० लोकांना प्रतिकात्मकरित्या नियुक्तीपत्र दिले.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काश्मीरच्या जनतेने लोकशाहीचा झेंडा उचलून धरला, याबाबत मी व्यक्तिशः येथील जनेतेचे आभार व्यक्त करतो. “तुमच्यामुळे लोकशाहीचा विजय झाला. मागच्या ३५ ते ४० वर्षांतील मतदानाचे सर्व रेकॉर्ड तुम्ही मोडीत काढले. यावरूनच दिसते की, राज्यातील जनतेचा लोकशाहीवर गाढा विश्वास आहे. यासाठीच मी काश्मीर खोऱ्यातील लोकांचे आभार व्यक्त करण्यासाठी आलो आहे”, अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी लोकांचे आभार मानले.

दहशतवादाविरोधात भूमिका मांडताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “अलीकडच्या काळात राज्यात काही दहशतवादी हल्ले झाले आहेत. आम्ही हे हल्ले गांभीर्याने घेतले असून केंद्रीय गृहमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली आहे. मी तुम्हाला आश्वस्त करतो की, शांततेच्या शत्रूंना योग्य तो धडा शिकविला जाईल. जम्मू आणि काश्मीरमधील नवी पिढी शांततेत जीवन व्यतीत करेल, हा शब्द मी तुम्हाला देतो.”