न्यूयॉर्क : हवामान बदलाबाबतचा इशारा ही जगाची सर्वांत मोठी फसवणूक आहे आणि या ‘हरित’ घोटाळ्यापासून तुम्ही दूर झाला नाहीत, तर तुमचा देश अपयशी ठरेल, असे खळबळजनक विधान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेतील भाषणात केले. त्यांच्या भाषणाचे पडसाद जगभरात उमटत असून, अनेकांनी ट्रम्प यांची वक्तव्ये साधार खोडून काढली आहेत.
संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेमध्ये ट्रम्प यांचे सुमारे तासभर भाषण झाले. त्यात अमेरिकी धोरणांचे कौतुक आणि जगभरातील गाऱ्हाणी मांडण्यात आली. ‘अमेरिका फर्स्ट’ या धोरणाचा पुनरुच्चार करताना त्यांनी अमेरिकेने माझ्या नेतृत्वाखाली घेतलेले यू-टर्न चांगले असून स्थलांतरित आणि हरित ऊर्जेच्या गुंतागुंतीच्या मुद्द्यांवर युरोपने भूमिका बदलली नाही, तर त्यांचे नुकसान होईल, असा इशाराही दिला.
ट्रम्प म्हणाले, ‘संयुक्त राष्ट्र आणि इतर अनेकांनी बऱ्याचदा वाईट हेतूने केलेली भाकिते चुकीची होती. अशी भाकिते मूर्ख लोकांनी केली. त्याची किंमत त्यांच्या देशाला चुकवावी लागली.’ अपारंपरिक ऊर्जास्रोतांचीही ट्रम्प यांनी खिल्ली उडवली. ‘पवनऊर्जा हा एक विनोद आहे. अशा ऊर्जा काम करीत नाहीत. त्या खूप महाग आणि तुलनेने कमी ऊर्जा देतात,’ असे ते म्हणाले.
हवामान बदल रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी केलेल्या प्रयत्नांवर टीका करताना ट्रम्प म्हणाले, ‘बनावट अशा पॅरिस हवामान करारातून अमेरिका बाहेर पडला. कार्बनबाबतही काही लोक दुष्ट हेतूने कांगावा करत आहेत. गायींमुळे मिथेन वायूचे उत्सर्जन अधिक होते, अशी भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली.