Punjab News Indian Youth Forced to Join Russian Army : पंजाबमधील मोगा जिल्ह्यातील रहिवासी बूटा सिंग शैक्षणिक व्हिसावर रशियाला गेला होता. त्यानंतर वर्षभराने तो एका व्हिडीओच्या माध्यमातून सर्वांसमोर आला. या व्हिडीओत तो रशियन लष्करी जवानांच्या गणवेशात दिसला. या व्हिडीओद्वारे त्याने भारत सरकारला विनंती केली आहे की त्याला तिथून बाहेर काढावं. बूटा सिंग एका एजंटला ३.५० लाख रुपये देऊन नोकरीच्या शोधात रशियाला गेला होता.
बूटा सिंगच्या कुटुंबियांनी सांगितलं की तो नोकरीच्या शोधात रशियाला गेला होता. मात्र, तिथे गेल्यावर रशियन लष्कराने त्याला युक्रेनविरोधातील युद्धात लढण्यासाठी जबरदस्तीने सैन्यात भरती करून घेतलं. मात्र, आता त्याला परत यायचं आहे. त्यासाठी त्याने भारत सरकारला विनंती केली आहे.
बूटा सिंगच्या बहिणीची भावाला वाचवण्यासाठी धडपड
बूटा सिंगची बहीण करमजीत कौर यांनी दी इंडियन एक्सप्रेसशी बातचीत केली. यावेळी त्या म्हणाल्या, “माझा भाऊ गेल्या वर्षी २४ ऑक्टोबर रोजी दिल्लीतल्या एका एजंटच्या माध्यमातून रशियाला गेला होता. युट्यूबच्या माध्यमातून त्याची या एजंटशी ओळख झाली होती. आम्हाला अलीकडेच समजलं की बूटाला जबरदस्तीने युद्धभूमीवर पाठवण्यात आलं आहे. त्याला रशियन सैन्यात भरती करून घेतलं आहे. त्याला कुठल्याही प्रकारचं शस्त्र चालवता येत नाही. तो मृत्यूच्या दाढेखाली आहे. आम्ही केंद्र व पंजाब सरकारला विनंती करतो की त्यांनी माझ्या भावाला परत आणावं.
बूटा सिंग व इतर भारतीय तरुण रशियन लष्करात कसे दाखल झाले?
कथित व्हिडीओमध्ये बूटा हरियाणा व जम्मू-काश्मीरमधील चार तरुणांबरोबर दिसत आहे. त्यांच्यापैकी एकजण म्हणाला, “आम्ही मॉस्कोला आलो होतो. आम्ही येथील एका महिलेच्या संपर्कात होतो जिने दावा केला होता की ती कॉम्प्यूटर ऑपरेटर, वाहन चालक व इतर काही नोकऱ्यांमध्ये कामगारांची भरती करते. आम्ही अशाच प्रकारची नोकरी मिळावी यासाठी येथे आलो होतो. अशा प्रकारची नोकरी लावून देतो, चांगला पगार मिळेल, अशी आश्वासनं आम्हाला देण्यात आली होती.
२५ भारतीय तरुणांची फसवणूक
“आम्ही एकूण २५ जण होतो. येथे आल्यावर या लोकांनी आमच्याबरोबर एक करार केला. कंत्राटासंबंधीच्या काही दस्तावेजांवर या लोकांनी आम्हाला स्वाक्षरी करायला सांगितली. परंतु, त्यावर काय लिहिलंय ते आम्हाला माहिती नव्हतं. त्यानंतर आम्हाला रशियन लष्कराच्या प्रशिक्षण केंद्रावर पाठवलं. तिथे आमच्या हातात बंदूका सोपवण्यात आल्या. आम्ही बंदूक स्वीकारण्यास विरोध केला. आम्हाला बंदूका चालवता येत नसल्याचं त्यांना (रशियन लष्करी अधिकारी) सांगितलं. त्यावर ते आम्हाला म्हणाले, ‘तुम्ही युद्धभूमीवर शत्रूला गोळ्या घाला नाहीतर आम्ही तुम्हाला ठार करू’. आता आम्हाला युक्रेनच्या सीमेवर आणलं आहे. इथून जे लोक युद्धभूमीवर जातात ते बेपत्ता होतात, ठार मारले जातात किंवा परत येत नाहीत.”
बूटा सिंग व त्याच्याबरोबर रशियात अडकलेल्या भारतीय तरुणांनी पंजाब व केंद्र सरकारला विनंती केली आहे की “आम्हाला येथून बाहेर काढा. कदाचित हा आमचा शेवटचा व्हिडीओ असू शकतो. आम्हाला माहिती नव्हतं की इथे आणून आम्हाला रशियन लष्करात दाखल करून घेतलं जाईल. आमची फसवणूक झाली आहे.”