Qatar Airways Vegetarian Passenger Death: कतार एअरवेजच्या विमानात मांसाहारी जेवण खाल्ल्यामुळे एका ८५ वर्षीय प्रवाशाचा मृत्यू झाला होता. या घटनेची आता नव्याने चर्चा होत आहे. द इंडिपेंडेंटच्या बातमीनुसार, ८५ वर्षीय हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अशोक जयवीर यांनी शाकाहारी जेवणाची ऑर्डर दिली होती. मात्र विमानात त्यांना मांसाहारी जेवण देण्यात आले. १५.५ तासांचा लांबचा प्रवास असल्यामुळे तेच जेवण खाण्याची त्यांच्यावर नामुष्की आली. मात्र जेवणादरम्यान श्वास कोंडल्यामुळे अशोक जयवीर यांचा मृत्यू झाला. आता त्यांच्या कुटुंबियांनी कतार एअरवेजवर दाखल करून नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

कधी घडले प्रकरण?

हे प्रकरण ३० जून २०२३ रोजी घडले. डॉ. जयवीर यांनी लॉस एंजिलिसहून कोलंबोला जाणारे विमान घेतले होते. हा प्रवास तब्बल १५.५ तासांचा होता. प्रवासात जेवणासाठी त्यांनी शाकाहारी जेवणाची ऑर्डर दिली होती. मात्र फ्लाइटमधील कर्मचाऱ्यांनी सांगितले की, विमानात शाकाहारी जेवण उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांना मांसाहारी जेवण देण्यात आले. मांसाचा भाग सोडून इतर भाग खाऊ शकता, असेही विमानातील कर्मचाऱ्यांनी त्यांना सांगितले.

इंडिपेंडेंटच्या बातमीनुसार, डॉ. जयवीर यांनी मांसाहारी जेवणातील मांस सोडून इतर भाग खाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना खाताना अस्वस्थ वाटू लागले. श्वास कोंडल्यामुळे ते विमानातच बेशूद्ध पडले. फ्लाइटमधील क्रू सदस्यांनी त्यांची मदत करण्याचा प्रयत्न केला. तसेच डॉक्टरांची मदत घेण्याचाही प्रयत्न केला, पण जयवीर यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही.

परिस्थितीचे गांभीर्य पाहता स्कॉटलंडमधील एडनबर्ग येथे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. यानंतर डॉ. जयवीर यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र तीन दिवस उपचार केल्यानंतरही डॉ. जयवीर वाचू शकले नाहीत. ३ ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला.

डॉ. जयवीर यांचा मुलगा सूर्या याने कतार एअरवेजच्या विरोधात खूनाचा खटला दाखल केला. खाद्यपदार्थाची सेवा आणि वैद्यकीय उपचारात कुचराई केल्याचा आरोप जयवीर यांच्या मुलाने केला. वडिलांनी शाकाहारी जेवण आधीच सांगितले तरीही ते विमानात उपलब्ध करून देण्यात आले नाही, असाही आरोप मूलाकडून करण्यात आला.

जयवीर यांची मांसाहारी जेवणामुळे प्रकृती खालावली. त्यानंतर एअरलाइनने त्यांना तात्काळ वैद्यकीय उपचार उपलब्ध करून दिले नाहीत. यामुळे वडिलांचा मृत्यू झाला असा आरोप करत मुलगा सूर्याने वडिलांच्या मृत्यूसाठी १.१४ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली.