Radhika Yadav Whats App Chat: गुरुग्राममध्ये काल टेनिसपटू राधिका यादवची तिच्याच वडिलांनी गोळ्या घालून हत्या केली होती. आता या प्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. राधिका यादव परदेशात जाण्याचा विचार करत होती कारण तिला वाटत होते की, घरी खूप बंधने आहेत, असे तिच्या प्रशिक्षकासोबतच्या व्हॉट्सअॅप चॅट्समधून समोर आले आहे.
यामध्ये चॅट्समध्ये राधिकाने जीवनाचा आनंद घेण्यासाठी कुटुंबापासून दूर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. चॅट्समध्ये राधिकाने तिच्या प्रशिक्षकाला सांगितले की, “इथे खूप बंधने आहेत, मला जीवनाचा आनंद घ्यायचा आहे.” याबाबत इंडिया टुडेने वृत्त दिले आहे.
राधिकाने तिच्या प्रशिक्षकाशी परदेशात जाण्याबाबतही चर्चा केली होती. दुबई आणि ऑस्ट्रेलिया हे तिच्या निवडींपैकी एक होते, तर जेवणाचे पर्याय कमी असल्यामुळे तिला चीनला जायचे नव्हते.
दरम्यान, या हत्येचा तपास सुरू असून, न्यायालयाने आरोपी वडिलांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी सांगितले की, पीडित राधिकाचे वडील दीपक यादव यांनी तिच्या टेनिस अकादमीबाबत वारंवार होणाऱ्या वादातून तिची हत्या केली. परंतु इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात, आरोपी वडील तिच्या सोशल मीडिया रील्सवरून गावकऱ्यांनी मारलेल्या टोमण्यांमुळे नाराज होते.
राधिकाचा दोन वर्षांपूर्वी रिलीज झालेला एक म्युझिक व्हिडिओही समोर आला आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की, हा व्हिडिओच तिच्या हत्येला कारणीभूत ठरला असावा. राधिका लोकप्रिय युट्यूबर एल्विश यादवच्या गावातील होती आणि त्याच्यापासून ती प्रेरित झाली होती. तिला इन्फ्लुएन्सर व्हायचे होते. पण, तिच्या वडिलांना गावकरी वारंवार याबद्दल टोमणे मारत होते, असेही सूत्रांनी सांगितल्याचे इंडिया टुडेच्या वृत्तात म्हटले आहे.
टेनिसपटू राधिका यादवच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तिच्या छातीवर चार गोळ्या लागल्याचे उघड झाले आहे. पण, तिच्या वडिलांनी तिच्या पाठीत तीन गोळ्या झाडल्याचा दावा एफआयआरमध्ये केला आहे.
सरकारी रुग्णालयाच्या संचालक मंडळाचे सदस्य आणि सर्जन डॉ. दीपक माथूर यांनी इंडिया टुडेला दूरध्वनीवरून बोलताना सांगितले की, “राधिकावर चार गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, सर्व गोळ्या तिच्या छातीवर लागल्या होत्या.”
राधिकाच्या वडिलांना अटक केल्यानंतर, तिची आई मंजू यादव यांनी पोलिसांना औपचारिक जबाब देण्यास नकार दिला. पोलिसांनी त्यांची वारंवार चौकशी केली, तेव्हा त्यांनी सांगितले की, दीपकने ही हत्या का केली हे माहित नाही.