Radhika Yadav हरियाणाची टेनिसपटू राधिका यादवची तिच्याच वडिलांनी हत्या केल्यानंतर देशभरात खळबळ उडाली. क्रीडा क्षेत्रालाही यामुळे धक्का बसला. हरियाणातून अनेक खेळाडू आजवर क्रीडा क्षेत्रात पुढे आले आहेत. महिला खेळाडूही यात मागे नाहीत. अवघ्या २५ व्या वर्षी राधिकाने टेनिसमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली होती. मात्र कुटुंबात टेनिस आणि सोशल मीडिया या विषयांवर वाद निर्माण झाल्यानंतर वडिलांनी राधिकाची हत्या केली. दरम्यान आता राधिकाच्या मैत्रिणीची प्रतिक्रिया समोर आली आहे. राधिकाला शॉर्ट्स घालू दिल्या जात नव्हत्या, मुलांशी बोलण्यास मनाई होती असं या मैत्रिणीने सांगितलं आहे.
काय म्हटलं आहे राधिकाच्या मैत्रिणीने?
राधिकाची मैत्रीण हिमंशिका सिंगने आता राधिकाबाबत मौन सोडलं आहे. हिमंशिकाने सांगितलं राधिकाला मुलांशी बोलण्यास मनाई होती. तसंच तिला शॉर्ट पँट घालण्यासही वडिलांनी मज्जाव केला होता. टेनिस खेळताना ती मोकळेपणाने वागत असे. पण कुटुंबात तिचा जीव गुदमरत होता कारण तिच्यावर खूप बंधनं होती. तिला शॉर्ट्स घालण्यास, मुलांशी बोलण्यास मज्जाव होता त्यामुळे तिला वाईट वाटत असे. तिला तिच्या मूल्यांवर आयुष्य जगायचं होतं पण तसं करण्यास कुटुंबाकडून दबाव होता असं राधिकाच्या मैत्रिणीने आता सांगितलं आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.
हिमंशिकाने काय सांगितलं?
हिमंशिकाने एक व्हिडीओ पोस्ट करत राधिकाबाबत ही सगळी मााहिती दिली आहे. हिमंशिका म्हणते जेव्हा राधिका तिच्या घरातल्यांशी व्हिडीओ कॉलवर बोलायची तेव्हाही ती सतत दबावाखाली असे. खरंतर टेनिस अकादमी तिच्या घरापासून १५ मिनिटांच्या अंतरावर होती. तरीही तिला व्हिडीओ कॉल येत होते. तिला प्रचंड दबाव टाकण्यात येत होता असं तिच्या मैत्रिणीने सांगितलं. राधिकाचं कुटुंब जुनाट विचारांचं होतं. ती जे काही करायची त्याची मोकळीक तिला नव्हती.
नीरज चोप्राने काय म्हटलं आहे?
राधिका यादवच्या मृत्यूमुळे हरियाणाच्या क्रीडा विश्वात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. क्रीडा क्षेत्रातील खेळाडू आणि बॉलिवूडमधील सेलिब्रिटीही या घटनेबद्दल शोक व्यक्त करत आहेत. तसेच हरियाणाचा रहिवासी आणि भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रानेही याबद्दल मत व्यक्त केले आहे. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा नीरज चोप्रा हरियाणातील खेळाडूंसाठी प्रेरणास्थान आहे. ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्राने म्हटले की, हरियाणातील महिला क्रीडापटूंनी देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावले आहे. महिला क्रीडापटूंना आदर्श मानून त्यांचे अनुकरण करायला हवे. “या घटनेपूर्वी मी काही लोकांशी बोलत होतो. हरियाणातील महिला क्रीडपटूंनी देशात आपले वेगळे स्थान निर्माण केलेले आहे. देश त्यांच्याकडे आदराने पाहतो. कुटुंबामध्ये आपण एकमेकांना पाठिंबा दिला पाहिजे. तसेच महिला खेळाडूंचा आदर राखत त्यांना आदर्श मानले पाहिजे”, अशी प्रतिक्रिया नीरज चोप्राने दिल्याचे एनडीटीव्हीने म्हटले आहे.