भारतात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसचे दर सातत्याने वाढत आहेत. गेल्या १६ दिवसात १४ वी इंधन दरवाढ झाली आहे. यावरून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल सुरू केला आहे. काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरच्या दरवाढीवरून सरकारवर निशाणा साधला. ही ‘प्रधानमंत्री जन धन लूट योजना’ असल्याचे ट्विट राहुल गांधींनी केले आहे. २०१४ मध्ये मोटारसायकल, कार, ट्रॅक्टर आणि ट्रकच्या पेट्रोल टाक्या भरण्याच्या सध्याच्या किमतीची तुलना करणारा आलेख त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

ट्वीट केलेल्या आकडेवारीत २०१४ मध्ये स्कूटर किंवा बाइकची टाकी भरण्यासाठी ७१४ रुपये खर्च येत होता. आता त्याची किंमत १,०३८ रुपये आहे. ३२४ रुपयांनी भाव वाढले आहेत. २०१४ मध्ये चारचाकी गाडीची टाकी २,८५६ रुपयांना भरायची, आता त्यासाठी ४,१५२ रुपये मोजावे लागतात. टाकीच्या किमतीतील फरक १,२९६ रुपये झाला आहे. ट्रॅक्टरची टाकी भरण्यासाठी पूर्वी २,७४९ रुपये खर्च येत होता, आता त्याची किंमत ४,५६३ रुपये आहे. म्हणजेच लोकांना १,८१४ रुपये अधिक मोजावे लागत आहेत. त्याच वेळी,२०१४ मध्ये ट्रकची टाकी भरण्यासाठी ११,४५६ रुपये खर्च येत होता, तो आता वाढून १९,०१४ रुपये झाला आहे. म्हणजेच ट्रकची टाकी भरण्यासाठी लोकांना ७,५५८ रुपये जास्त मोजावे लागतात.

१६ दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात १० रुपयांनी वाढ झाली आहे. इंधनाच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी सांगितलं की, रशिया-युक्रेन युद्धानंतर भारतात पेट्रोलच्या किमतीत केवळ ५ टक्के वाढ झाली आहे. अनेक विकसित देशांमध्ये त्यात ५० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.