पक्ष देईल ती जबाबदारी घेण्यास तयार आहे असे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जाहीर केले आहे. मात्र काँग्रेसपुढे आगामी लोकसभा निवडणुकीत मोठे आव्हान आहे. काँग्रेसला पराभवाचा धक्का बसला तर अपयशाची जबाबदारी राहुल यांच्यावर येईल. त्यामुळे पंतप्रधानपदाची त्यांची उमेदवारी जाहीर करू नये, असा मतप्रवाह काँग्रेसमध्ये आहे.
आगामी निवडणुकीत मोदी विरुद्ध राहुल अशी लढत पाहायला मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्या दृष्टीने एका मुलाखतीत राहुल यांनी पक्षाचा सेवक या नात्याने जी जबाबदारी दिली जाईल ती पार पाडू असे जाहीर केले होते. शुक्रवारी काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत ही घोषणा अपेक्षित होती. मात्र अशी घोषणा जाहीर करण्याची काँग्रेसची परंपरा नाही असे सांगत राहुल यांच्या नावाची घोषणा टाळली जाईल अशी चिन्हे आहेत. काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी निवडणुकीपूर्वी पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करण्याची परंपरा काँग्रेसमध्ये नाही असा सूर लावला होता. राहुल यांच्याकडे प्रचाराची धुरा किंवा कार्यकारी अध्यक्षपद दिले जाईल अशी शक्यता आहे. दरम्यान, कार्यसमितीच्या बैठकीपूर्वी राहुल यांनी प्रमुख नेत्यांच्या बैठकीला हजेरी लावली. राहुल हे आमचे प्रमुख नेते आहेत. मात्र काँग्रेस महासमिती काय निर्णय घेईल हे कसे सांगणार, असे प्रवक्ते संदीप दीक्षित यांनी सांगितले. दिग्विजय सिंह यांनी याबाबत प्रतिकुल मत दिले आहे, त्याबाबत विचारले असता वरिष्ठ नेत्यांचे मत पक्षासाठी महत्त्वाचे असते अशी सारवासारव दीक्षित यांनी केली.
कुणाला आणि केव्हा जाहीर करायचे याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील असे त्यांनी स्पष्ट केले.भाजप आणि आम आदमी पक्ष यांची लढत दुसऱ्या क्रमांकासाठी, सत्ता काँग्रेसचीच येणार हे त्यांनी बजावले.