Raipur Murder Case Crime News : एक वकील आणि त्याच्या पत्नीने पैशांच्या संबंधी वादातून एका जेष्ठ नागरिकाची हत्या करून, मृतदेह एका सीमेंट घालून एका सुटकेसमध्ये भरल्याची धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. छत्तीसगड मधील रायपूर पोलिसांनी सेंट्रल इंडस्ट्रीयल सेक्युरिटी फोर्स (सीआयएसएफ) शी समन्वय साधल्यानंतर या जोडप्याला दिल्ली विमानतळावर अटक करण्यात आली आहे.

रायपूरच्या डीडी नगर येथे सोमवारी संध्याकाळी स्थानिकांना झाडीतून उग्र दुर्गंधी येत असल्याचे लक्षात आले, यानंतर तपासणी केली असता किशोर पैकरा यांचा सुटकेसमध्ये भरून फेकून देण्यात आलेला मृतदेह आढळून आला होता. यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती.

पोलिस घटनास्थळी आल्यानंतर त्यांना मृतदेहाबरोबर त्याची दुर्गंधी येऊ नये म्हणून सुटकेसमध्ये सीमेंट देखील भरल्याचे आढळून आले.

त्यानंतर पोलिसांनी या घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि त्यांना एक मागील बाजूला अर्धी बाहेर आलेली पेटी घेऊन जात असलेली ऑल्टो कार आढळून आली. तपासानंतर या लोखंडी पेटीतच ही मृतदेह असलेली सुटकेस ठेवण्यात आली होती, हे पोलिसांना आढळून आले. तर या कारच्या मागे एक महिला स्कूटरवरून जातानाही सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पैकरा हे रायपूरमध्ये एकटेच राहत होते, आणि ते मुख्य आरोपी अंकित उपाध्याय याच्या संपर्कात होते.

उपाध्याय याने पैकरा यांना त्यांची मालमत्ता विकण्यात मदत केली होती. पण उपाध्याय याने त्यातील मोठी रक्कम स्वत:कडे ठेवून घेतली आणि पैकरा यांना याबद्दल सांगितले नाही. पण जेव्हा पैकरा यांना याबद्दल समजले तेव्हा त्या दोघांमध्ये वाद झाला, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

पोलिसांच्या मते हत्या ही २१ जून किंवा २२ जून रोजी उपाध्यायने भाड्याने घेतलेल्या डीडी नगर येथील फ्लॅटमध्ये झाली, आणि २३ जून रोजी सकाळी मृतदेह फेकून देण्यात आला.

पैकरा यांची हत्या केल्यानंतर उपाध्याय आणि त्याची पत्नी शिवानी शर्मा यांनी दुसऱ्या एका व्यक्तीची मदत घेऊन मृतदेह फेकून दिला. सुरूवातीला निर्जन ठिकाणी मृतदेह फेकून देण्याची योजना आरोपींनी आखली होती, पण अचानक आरोपींना भीतीने खेरले असू शकते असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

हत्या करणाऱ्यांना त्यांना कोणीतरी पाहील याची भीती वाटली असू शकते, त्यामुळेच त्यांनी मृतदेह गाडीतून बाहेर घेऊन गेल्यानंतर निवासी भागाच्या जवळच फेकून दिला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मंगळवारी या जोडप्याने विमानाने दिल्ली गाठले. पण तेव्हा पोलिसांनी त्यांचा माग काढला आणि विमानतळावरील सीआयएसएफला याबद्दल सूचना दिली, ज्यांनी या दोघांना ताब्यात घेतला. दरम्यान रायपूरचे वरिष्ठ एसपी लाल उमेद सिंह यांनी सांगितले की, “उपाध्याय आणि त्याची पत्नी शिवानी हे प्रमुख आरोपी आहेत.”