Ranya Rao Stepfather sent on compulsory leave : सोन्याची तस्करी प्रकरणात कन्नड अभिनेत्री रान्या रावचे सावत्र वडील डीजीपी रामचंद्र राव यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. आयपीएस अधिकारी असलेले राव हे सध्या कर्नाटक स्टेट पोलीस हाऊसिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये मॅनेजिंग डायरेक्टर पदावर कार्यरत आहेत. दरम्यान आज संध्याकाळी राव यांच्या रजेचा आदेश जारी करण्यात आला. ज्यामध्ये कोणतेही कारण स्पष्ट केलेले नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दुबई येथून येताना ३ मार्च रोजी केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर रान्या राव कडे १२.५६ कोटी रुपये किमतीचे सोन्याचे बिस्किटे जप्त करण्यात आली होती. त्यानंतर अभिनेत्रीच्या निवासस्थानाची देकील तपासणी करण्यात आली होती. आधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या झडतीमध्ये त्यांना २.०६ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि २.६७ कोटी रुपयांची रोकड आढळून आली होती. त्यानंतर डीआरआय तसेच ईडी आणि सीबीआय देखील या प्रकरणाचा तपास करत आहे.

रान्या रावच्या अटकेनंतर काय म्हणाले होते?

सोने तस्करी प्रकरणात अटक झाल्यानंतर रान्या रावच्या वडिलांनी आपल्याला याबद्दल काहीही माहिती नसल्याचे म्हटले होते. “माध्यमांमधून याबद्दल आम्हाला समजल्यानंतर इतर कोणत्याही वडिलांप्रमाणे मला धक्का बसला आणि मी निराश झालो. मला अशा कोणत्याही गोष्टीबद्दल माहिती नाही. मला अधिक काही बोलायचे नाही,” अशी प्रतिक्रिया राव यांनी रान्याच्या अटकेनंतर दिली होती.

“ती आमच्याबरोबर राहत नाहीये… ती तिच्या पतीबरोर वेगळी राहते. त्यांच्यात काहीतरी अडचण असेल…काही कौटुंबिक कारणांमुळे,” असे वरिष्ठ पोलिस अधिकारी रामचंद्र राव म्हणाले होते.

रान्या रावचा खळबळजनक दावा

परप्पाना अग्रहारा तुरुंगाच्या मुख्य अधीक्षकांना पाठवलेल्या पत्रात रान्याने खळबळजनक दावे केले आहेत. अभिनेत्रीने म्हटले आहे की, तिला विमानातच अटक करण्यात आली आणि डीआरआयने स्पष्टीकरण देण्याची संधी न देता तिला ताब्यात घेतले. यावेळी तिला १०-१५ वेळा थप्पड मारली. तिने असाही दावा केला की, वारंवार मारहाण होऊनही, तिने डीआरआय अधिकाऱ्यांनी तयार केलेल्या निवेदनांवर सही करण्यास नकार दिला. मात्र अत्यंत दबावाखाली तिला अखेर ५०-६० टाइप केलेली आणि ४० कोऱ्या पांढऱ्या कागदांवर सही करण्यास भाग पाडण्यात आले.

अटक झाल्यानंतर काही दिवसांनी, रान्याचा कोठडीतील एक फोटो व्हायरल झाला, ज्यामध्ये ती तणावाखाली आणि डोळ्यांखाली काळे डाग असलेली दिसत होती.या सोने तस्करी प्रकरणात बेंगळुरूच्या विशेष न्यायालयाने तिचा जामीन नाकारल्यानंतर एका दिवसानंतर हे स्फोटक पत्र समोर आले आहे. तीन दिवस डीआरआय कोठडीत असलेल्या रान्याला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranya rao stepfather and dgp ramachandra rao sent on compulsory leave gold smuggling case rak