मॉस्को : वॅग्नेर या खासगी सैन्याचे प्रमुख येवजेनी प्रिगोझिन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रशियाविरुद्ध अल्पकाळ केलेल्या सशस्त्र बंडाची चौकशी बंद करण्यात आली असून या सर्वावर कोणताही आरोप ठेवलेला नाही, असे रशियातर्फे मंगळवारी जाहीर करण्यात आले. यासंदर्भात फेडरल सिक्युरिटी सव्र्हिस (एफएसबी)तर्फे सांगण्यात आले की, बंडात सामील झालेल्यांनी तसे गुन्हेगारी कृत्य करण्याआधीच आपले पाऊल मागे घेतले. त्यामुळे याप्रकरणी पुढे कोणताही तपास केला जाणार नाही.
आधी पुतिन यांनी या बंडखोरांना देशद्रोही म्हटले होते. त्यांना शिक्षा केली जाईल, असेही त्यांनी जाहीर केले होते. पण, शनिवारी बंड संपुष्टात येताच प्रिगोझिन आणि त्यांच्या सैनिकांवर कोणताही खटला न चालविण्याची ग्वाही क्रेमलिनतर्फे देण्यात आली होती.
रशियात देशाविरुद्ध सशस्त्र बंड केल्याच्या गुन्ह्याबद्दल २० वर्षे तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. रशियात सरकारविरोधी निदर्शकांवर कठोर कारवाई केली जात असताना प्रिगोझिन आणि त्यांचे सैनिक बंडखोरीनंतरही सहीसलामत सुटले आहेत. ही बाब तेथील सद्यस्थितीशी अत्यंत विसंगत मानली जात आहे. रशियात अनेक राजकीय विरोधक दीर्घकालीन तुरुंगवासात असून कष्टप्रद अशा छावण्यांत दिवस कंठत आहेत.
प्रिगोझिन सध्या कुठे आहेत, हे मंगळवापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. त्यांनी नजीकच्या बेलारूसमध्ये आश्रय घेतला असावा, असे रशिया सरकारचे म्हणणे आहे. पण त्याला प्रिगोझिन किंवा बेलारूस यांच्याकडून दुजोरा मिळू शकला नाही. बेलारुस्की हजून या प्रकल्पावर तैनात असलेल्या बेलारसच्या सैन्याने म्हटले आहे की, प्रिगोझिन वापरत असलेले बिझनेस जेट मंगळवारी सकाळी मिन्सनजीक उतरल्याचे दिसून आले.
विशेष म्हणजे पुतिन यांचे जवळचे मित्र आणि प्रिगोझिन यांना बंड पुढे नेण्यापासून रोखणारे बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी मंगळवारी प्रिगोझिन यांच्याबाबत कोणतीही वाच्यता केली नाही. रशियाचा भक्कम आर्थिक आणि राजकीय पािठबा असलेल्या लुकाशेन्को यांनी दावा केला होता की, प्रिगोझिन यांचे बंड हे अध्यक्ष पुतिन यांच्याविरोधात नाही तर, संरक्षणमंत्री सर्जेई शोईगू यांच्याविरोधात होते. या बंडापासून रशियाला मोठा धोका असल्याने आपण बेलारूसचे सैन्य मुकाबल्यासाठी सज्ज ठेवले होते, असाही त्यांचा दावा आहे.
बंडात रशियाच्या शत्रूंचा हात -पुतिन
मॉस्को : रशियात खासगी सैन्याचे बंड घडवून आणणारे हे देशद्रोही असून ते युक्रेन सरकार आणि त्यांच्या मित्रराष्ट्रांच्या हातातील बाहुले होते, असा हल्ला सोमवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी चढविला. त्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास दूरचित्रवाणीवरून सुमारे पाच मिनिटे देशाला उद्देशून भाषण केले. देशात सर्वकाही ठीक असल्याचे भासविण्याचा त्यांचा प्रयत्न होता. बंडखोरांवर टीका करतानाच त्यातून बहुसंख्य खासगी सैनिक किंवा त्यांचे पाठीराखे दुखावले जाणार नाही आणि आणखी काही संकट उद्भवणार नाही, याची दक्षता पुतिन यांनी घेतली. क्रेमलिनने हे बंड ज्या पद्धतीने हाताळले, त्यातून काही जण संतप्त झाले आहेत. रक्तपात टाळल्याबद्दल त्यांनी खासगी सैनिकांची स्तुती केली. बंडाला काही ठिकाणी पाठिंबा मिळत असल्याची चिन्हे होती. पण, या काळात देश एकोप्याने उभा राहिला असा दावाही त्यांनी केला.
बेलारूसमध्ये प्रिगोझिन यांना अडकविण्याचा डाव?
वॉशिंग्टनमधील एका तज्ज्ञ गटाच्या म्हणण्यानुसार, युक्रेनचा प्रतिहल्ला जोर पकडत असताना रशियाला वॅग्नेरसारख्या प्रशिक्षित सैन्याची मोठी गरज आहे. त्यांचे बळ रशियासोबत कायम राहावे, असा रशियाचा प्रयत्न आहे. पण, आता पुतिन आणि प्रिगोझिन यांच्यात समेट होणे अशक्य असून त्यांना सुरक्षित आश्रयाच्या नावाखाली बेलारूसमध्ये अडकविले जात आहे, असा दावा दी इन्स्टिटय़ूट फॉर दी स्टडी ऑफ वॉरने केला आहे. प्रिगोझिन यांनी सोमवारी सांगितले होते की, बेलारूसच्या नेतृत्वाने त्यांना कायद्याच्या कक्षेत आपले काम सुरू ठेवण्याचा प्रस्ताव दिला आहे. पण, त्याबाबत संदिग्धता आहे.