उत्तर प्रदेशातील आग्र्यामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलातील एका निवृत्त जवानाने बँकेतीन रोख रक्कम न मिळाल्याने आत्महत्या केली. केंद्रीय राखीव पोलीस दलात सेवा बजावलेले राकेश चंद अनेकदा पैसे काढण्यासाठी बँकेत गेले. मात्र प्रत्येक वेळी त्यांना खाली हाताने माघारी परतावे लागले. त्यामुळेच त्रस्त झालेल्या राकेश चंद यांनी त्यांच्याकडे असलेल्या बंदुकीतून स्वत:वर गोळी झाडली. राकेश चंद यांना उपचारांसाठी पैशांची गरज होती.
राकेश चंद केंद्रीय राखीव पोलीस दलात असताना १९९० मध्ये काश्मीरमध्ये तैनात होते. त्यावेळी त्यांना पाच गोळ्या लागल्या होत्या. शस्त्रक्रिया करुन या गोळ्या त्यांच्या शरीरातून काढण्यात आल्या. राकेश यांनी दहशतवाद्यांच्या गोळ्या झेलल्या. मात्र नोटाबंदीमुळे त्यांच्या जीवनाची अखेर झाली. गोळ्या लागल्यानंतर राकेश चंद यांना हृदयाचा त्रास सुरू झाला होता, अशी माहिती त्यांचे पुत्र सुशील यांनी दिली. राकेश चंद २०१२ मध्ये सेवानिवृत्त झाले.
गेल्या अनेक दिवसांपासून राकेश चंद ताजगंजमधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत पैसे काढण्यासाठी जात होते. मात्र राकेश यांना प्रत्येकवेळी रिकाम्या हाताने परतावे लागले होते. राकेश आग्र्यातील बुढाना गावचे रहिवासी होते. ‘माझ्या वडिलांना हृदयावरील उपचारांसाठी पैशांची आवश्यकता होती. त्यांना १५ हजार रुपये निवृत्ती वेतन मिळत होते. डॉक्टरांकडे जाण्यासाठी आणि औषधांसाठी पैशांची गरज होती,’ अशी माहिती राकेश चंद यांचे पुत्र सुशील यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द झाल्या. पंतप्रधानांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यापासून लोकांना चलन तुटवड्याला सामोरे जावे लागत आहे. नोटाबंदीच्या निर्णयाला महिन्याभराचा कालावधी उलटूनही परिस्थिती अतिशय बिकट आहे. अनेक बँका आणि एटीएमपर्यंत रोख रक्कम पोहोचलेली नाही. त्यामुळे काही ठिकाणी वादविवाद, मारहाणीचे प्रकार घडताना दिसत आहेत.
देशभरातील चलन तुटवडा संपुष्टात यावा, म्हणून सध्या रिझर्व्ह बँकेच्या प्रिंटींग प्रेसमध्ये अव्याहतपणे काम सुरू आहे. मात्र तरीही ज्या प्रमाणात पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द झाल्या, त्या प्रमाणात नव्या नोटा उपलब्ध झालेल्या नाहीत. नोटाबंदीच्या निर्णयामुळे पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द झाल्या. या नोटांचे एकूण मूल्य साडे पंधरा लाख कोटी रुपये इतके आहे. लोकांकडून आतापर्यंत १२ लाखांच्या जुन्या नोटा बँकांमध्ये जमा करण्यात आल्या आहेत. मात्र सरकारकडून अवघ्या ५ लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनात आणल्या गेल्या आहेत.