PM Narendra Modi India-France CEO Forum : व्यावसायिकांनी भारतात येण्याची (गुंतवणूक करण्याची) हीच योग्य वेळ आहे. कारण देश २०४७ पर्यंत देश विकसित भारत बनण्याच्या दिशेने काम करत आहे. त्यामुळे एक मजबूत व्यवसाय अनुकूल वातावरण आणि धोरणात्मक सातत्या प्रदान केले जात आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्समधील व्यावसायिकांना आश्वस्त केलं. ते १४ व्या भारत-फ्रान्स सीईओ फोरमला संबोधित करत होते. ही बैठक म्हणजे भारत आणि फ्रान्समधील सर्वोत्तम व्यावसायिक विचारांचा संगम असल्याचं मोदींनी म्हटलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“मी पाहतोय की तुम्ही सर्वजण नवोन्मेष, सहयोग आणि एकात्मिकतेच्या मंत्राने काम करत आहात. तुम्ही केवळ संबंध निर्माण करत नाहीत, तर तुम्ही भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारी देखील मजबूत करत आहात”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. त्यापूर्वी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी भारत-फ्रान्स सीईओ फोरममध्ये पंतप्रधान मोदींचे स्वागत केले.

दोन वर्षांतील सहावी भेट

“राष्ट्रपती मॅक्रॉन यांच्यासोबत या शिखर परिषदेत सहभागी होणे माझ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. गेल्या दोन वर्षांत ही आमची सहावी बैठक आहे. गेल्या वर्षी, राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन हे आपल्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे होते. आज सकाळी, आम्ही एकत्रितपणे एआय अॅक्शन समिटचे सह-अध्यक्षपद भूषवले. या यशस्वी शिखर परिषदेबद्दल मी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचे मनापासून अभिनंदन करतो”, असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान मोदींनी या कार्यक्रमात एआय, अवकाश तंत्रज्ञान आणि ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमातील भारताच्या कामगिरीवरही प्रकाश टाकला.

जागतिक गुंतवणुकीसाठी भारत पसंतीचा देश

“आम्ही २०४७ पर्यंत १०० गिगावॅट अणुऊर्जेच्या उद्दिष्टासह काम करत आहोत. हे क्षेत्र खाजगी क्षेत्रासाठी देखील खुले करण्यात आले आहे”, असं पंतप्रधानांनी सांगितले. पंतप्रधानांनी पुढे सांगितले की, आज भारत वेगाने जागतिक गुंतवणूकीसाठी एक पसंतीचे ठिकाण बनत आहे. गेल्या दशकात भारतात झालेल्या परिवर्तनकारी बदलांची तुम्हाला जाणीव आहे. आम्ही स्थिर आणि अंदाज लावता येण्याजोग्या धोरणाची परिसंस्था स्थापित केली आहे. सुधारणा, कामगिरी आणि परिवर्तन या मार्गावर चालत, भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे”, असा पुनरुच्चार पंतप्रधान मोदी यांनी केला.

“जागतिक स्तरावर आमची ओळख अशी आहे की आज भारत वेगाने जागतिक गुंतवणुकीसाठी एक पसंतीचे ठिकाण बनत आहे. आम्ही सेमीकंडक्टर आणि क्वांटम मिशन सुरू केले आहेत आणि संरक्षण क्षेत्रातही ‘मेक इन इंडिया’ आणि ‘मेक फॉर द वर्ल्ड’ ला प्रोत्साहन देत आहोत”, असे पंतप्रधान मोदी यांनी मेळाव्यात सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Right time to invest in india pm modi at india france ceo forum sgk