Rohtak Man Suicide Case: हरियाणाच्या रोहतकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मगन नावाच्या एका व्यक्तीने पत्नी आणि प्रियकराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. आत्महत्या करत असताना मगन याने पत्नी आणि तिचा प्रियकर दीपक यांना याबाबत जबाबदार धरले आहे. दीपक हा महाराष्ट्र पोलीस दलात नोकरी करतो. मगनचा सोशल मीडियावरील व्हिडीओ पाहून त्याच्या कुटुंबियांनी त्याच्या घरी धाव घेतली. तिथे गळफास घेतलेल्या अवस्थेत मगनचा मृतदेह आढळून आला.

ही घटना १८ जून रोजी घडली. यानंतर मगनची पत्नी दिव्या आणि तिचा प्रियकर दीपक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या दोघेही फरार आहेत. मगन आणि दिव्या यांना एक मुलगा आहे.

सासरची हत्या करण्याचा दबाव

आत्महत्येपूर्वी केलेल्या व्हिडीओमध्ये मगनने आरोप केला की, त्याची पत्नी दिव्या ही मगनच्या वडिलांची हत्या करण्यासाठी दबाव टाकत होती. यामुळे त्यांची संपत्ती मगनच्या नावावर होईल आणि संपत्ती विकून तिला पैसे मिळवता येईल. या संपत्तीमधून आलेल्या पैशांतून दिव्याला पाच लाख रुपये हवे होते. दीपकला पोलीस दलात वरचा हुद्दा मिळवायचा होता, यासाठी त्याला लाच द्यायची होती. तसेच दिव्याला प्रियकर दीपकसह मुंबईला स्थायिक व्हायचे होते, असेही मगनने अखेरच्या व्हिडीओत म्हटले आहे.

मी तिला शेतातील गहू विकून पाच लाख रुपये दिले होते. तसेच माझे ब्रासलेट गहाण ठेवून आणखी दोन लाख रुपये दिले होते. पण एवढे पैसे देऊनही ते माझ्याकडे आणखी १.५ लाख रुपये मागत होते, असेही मगनने आपल्या व्हिडीओत म्हटले आहे. तसेच मी माझ्या वडिलांना मारू शकत नाही, त्यापेक्षा मी स्वतःला संपवतो, असेही मगनने म्हटले.

दिव्याचे आधीच लग्न झाले होते

मगनने पुढे सांगितले की, दिव्याचे आधीच लग्न झालेले होते. तसेच पहिल्या पतीपासून तिला एक मुलगाही होता. पण ही माहिती तिने माझ्यापासून लपवली. तसेच तिने पहिल्या पतीपासून रितसर घटस्फोटही घेतलेला नव्हता. मी एका वकिलाचा सल्ला घेतला असता त्यांनी तिला न्यायालयात खेचण्यास सांगितले. मात्र मी पैसे देऊन हे प्रकरण मिटवून टाकावे, असे पत्नीला सांगितले.

२०२० साली झाले होते लग्न

मगनच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, मगन आणि दिव्या एकमेकांना २०१९ साली सोशल मीडियावर भेटले होते. त्यानंतर मगनने कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीला कुटुंबाने या लग्नाला मान्यता दिली नाही, पण जेव्हा दिव्याने मुलाला जन्म दिला, तेव्हा त्यांनी दोघांना स्वीकारले.

दिव्या नोकरी करत होती, ही माहिती मगनच्या कुटुंबियांपासून लपवून ठेवण्यात आली होती, असेही मगनने कुटुंबियांनी सांगितले. ती कामानिमित्त नेहमी घराबाहेर जायची. याचवेळी तिची भेट मुंबई पोलीस दलातील शिपाई दीपकशी झालेली असावी, असा संशय कुटुंबियांना आहे. २० मार्च २०२५ रोजी ती कामानिमित्त घराबाहेर पडली, मात्र ती परत आलीच नाही.