बंगळूरु : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) ही उच्च जातींची संघटना आहे, अशी टीका कर्नाटकातील काँग्रेसचे नेते सिद्धरमय्या यांनी केली. केंद्र सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेचीही खिल्ली त्यांनी उडवली. ही मोहीम एक नाटक असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘महान नाटककार’ आहेत, अशी उपाहासात्मक टीका सिद्धरमय्या यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री असलेल्या सिद्धरमय्या यांनी भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात भाजप आणि आरएसएस यांचे योगदान काय, असा प्रश्न उपस्थित केला. भारताचा राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत आणि राज्यघटना यांना त्यांनी विरोध केला होता. त्यांना देशभक्त कसे म्हणावे, असा सवाल सिद्धरमय्या यांनी विचारला. ‘‘आरएसएस या संघटनेचा मी सुरुवातीपासूनच विरोध केला आहे. कारण ही केवळ उच्च जातींची संघटना आहे. ते चातुर्वण्र्य व्यवस्थेवर विश्वास ठेवतात. चातुर्वण्र्य व्यवस्था ही उच्च जातींच्या वर्चस्वावर आधारित असून जर ही व्यवस्था सुरू राहिली तर त्यामुळे असमानता निर्माण होईल, ज्यामुळे कनिष्ठ वर्गाचे शोषण होईल,’’ असे सिद्धरमय्या म्हणाले. आरएसएस, भाजप, हिंदू महासभा, हिंदू जनजागरण वेदिका, बजरंग दल या संघटना जातिव्यवस्था आणि त्यासंबंधी विचारसरणीला मानतात. त्यामुळे या संघटनांना तीव्र विरोध केला पाहिजे, असे सिद्धरमय्या यांनी सांगितले. नागपूर येथील आरएसएसच्या मुख्यालयावर ५२ वर्षे तिरंगा फडकवला गेला नव्हता, असे ते म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rss an association of upper castes says karnataka congress leader siddaramaiah zws
First published on: 10-08-2022 at 04:48 IST