मॉस्को : रशियाने पाकिस्तानला ‘जेएफ-१७’ या लढाऊ विमानांसाठी ‘आरडी-९३’ इंजिनांची विक्री करण्याचा भारतालाच फायदा होईल, असा दावा रशियाच्या संरक्षणतज्ज्ञांनी केला आहे. रशिया-पाकिस्तानदरम्यान झालेल्या या व्यापार करारावरून भारतातील विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर टीका करणे अनाठायी असल्याचे मत या तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
मॉस्कोस्थित ‘प्रिमकोव्ह इन्स्टिट्यूट’ या प्रतिष्ठित संस्थेतील अभ्यासक प्योत्र तोपिश्कानोव्ह म्हणाले की, “या कराराचा भारताला दोन प्रकारे फायदा होईल. एक म्हणजे चीन आणि पाकिस्तानला या इंजिनांची जागा घेईल अशी दुसरी इंजिने विकसित करण्यात आलेली नाहीत. दुसरे, ही इंजिने बसवल्यावर पाकिस्तानच्या विमानांच्या हालचाली भारतासाठी अपरिचित असणार नाहीत. कारण भारताने ऑपरेशन सिंदूरदरम्यान वापरलेल्या लढाऊ विमानांमध्ये ‘आरडी-९३’ इंजिन होते.”
मात्र, अन्य एका अभ्यासकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, त्यांच्या माहितीनुसार, रशियाने हा व्यवहार करण्यापूर्वी आपण पाकिस्तानला केवळ इंजिन देत आहोत, तंत्रज्ञान नाही असे सांगून भारताचे मन वळवले होते.