Russia Ukraine War : रशिया-युक्रेनमध्ये गेल्या तीन वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. या संघर्षात आतापर्यंत हजारो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. एवढंच नाही तर आतापर्यंत दोन्ही बाजूंचे शेकडो सैनिकही मृत्युमुखी पडले आहेत. पण तरीही हा संघर्ष थांबत नसल्याची परिस्थिती आहे. असं असतानाच मागील काही महिन्यांपासून अशा बातम्या समोर येत आहेत की भारतीय तरुणांना रशियन सैन्यात भरती करून त्यांचा युक्रेनच्या विरोधात लढण्यासाठी युद्धात वापर केला जात आहे.

पैशांच्या बदल्यात काही भारतीय तरुण या युद्धात सहभागी होत असल्याचा दावा केला जात आहे. आता एक अशाच प्रकारची धक्कादायक घटना समोर आली असून युक्रेनने एक मोठा दावा केला आहे. रशियन सैन्यासाठी लढणाऱ्या एका २२ वर्षीय भारतीय तरुणाला युक्रेनियन सैन्याने ताब्यात घेतल्याचा दावा युक्रेनने केला आहे. अद्याप या घटनेची भारतीय अधिकाऱ्यांनी पुष्टी केलेली नाही. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.

युक्रेनियन माध्यमांमध्ये या संदर्भातील वृत्त असून त्यामध्ये भारतीय व्यक्तीची ओळख माजोती साहिल मोहम्मद हुसेन अशी असून तो मूळ गुजरातचा असल्याचं वृत्तात म्हटलं आहे. याबाबत परराष्ट्र मंत्रालयातील सूत्रांनी म्हटलं की, “आम्ही या वृत्ताची सत्यता पडताळत आहोत. आम्हाला अद्याप युक्रेनियन सैन्याकडून याबाबत कोणताही औपचारिक संदेश मिळालेला नाही.”

द कीव इंडिपेंडेंटच्या वृत्तानुसार, रशियामध्ये विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या हुसेनला युक्रेनच्या विरुद्ध लढण्यासाठी रशियन सैन्यात भरती करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. एका व्हिडीओमध्ये हुसेन दिसत असून तो असं म्हणत आहे की, त्याला रशियामध्ये ड्रग्जशी संबंधित आरोपांवर सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. तुरुंगात असताना पुढील शिक्षा टाळण्यासाठी त्याला रशियन सैन्याबरोबर करार करण्याची संधी देण्यात आली होती, ती संधी त्याने स्वीकारली.

हुसेनने व्हिडीओत काय म्हटलं?

“मला तुरुंगात राहायचं नव्हतं, म्हणून मी विशेष लष्करी कारवाईसाठी करारावर स्वाक्षरी केली. पण मला तेथून बाहेर पडायचं होतं.” तसेच त्याने युक्रेनियन सैन्याला सांगितलं की त्याला रशियन सैन्याकडून १६ दिवसांचं प्रशिक्षण मिळालं आणि १ ऑक्टोबर रोजी त्याला त्याच्या पहिल्या लढाऊ मोहिमेवर पाठवण्यात आलं. त्याने तीन दिवस लढाऊ मोहिमेत घालवले आणि नंतर त्याच्या कमांडरशी झालेल्या संघर्षानंतर त्याने युक्रेनियन सैन्यासमोर आत्मसमर्पण केलं.

“मला सुमारे २-३ किलोमीटर अंतरावर युक्रेनियन खंदक आढळली. मी ताबडतोब माझी रायफल खाली ठेवली आणि सांगितलं की मला लढायचं नाही. मला मदतीची आवश्यकता आहे.”, तसेच हुसेनने असाही दावा केला की त्याला रशियन सैन्यात सामील होण्यासाठी आर्थिक मदतीचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र, काहीही मिळालं नाही. तसेच तो म्हणत आहे की “मला रशियाला परत जायचं नाही. मी येथे (युक्रेनमध्ये) तुरुंगात जाण्यास प्राधान्य देईन.”