संभाजीराजे छत्रपती यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव ( केसीआर ) यांची भेट घेतली आहे. तेलंगणात संभाजीराजे आणि केसीआर यांच्यात ही भेट झाली आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात याची चर्चा सुरु आहे. स्वत: संभाजीराजे छत्रपती यांनी या भेटीबद्दल ट्विट करुन माहिती दिली आहे.
हैदराबादच्या पंजागुट्टा येथील मुख्यमंत्र्यांच्या प्रगती निवास येथे गुरुवारी ( २६ जानेवारी ) संभाजीराजे आणि केसीआर यांची भेट झाली. या भेटीत संभाजीराजेंनी स्नेहभोजनासह मुख्यमंत्र्यांबरोबर विविध विषयांवर चर्चा केली आहे. या भेटीनंतर संभाजीराजेंनी केसीआर यांच्या कामांचं कौतुक केलं आहे. तसेच, केसीआर यांना राजर्षी शाहू छत्रपती यांचा चरित्रग्रंथ भेट देण्यात आला आहे.
हेही वाचा : “आनंद दिघेंचे पंख छाटण्याचं काम झालं”, नरेश मस्केंचं विधान; म्हणाले, “उद्धव ठाकरेंच्या स्वागताला…”
ट्वीट करत संभाजीराजे छत्रपती म्हणाले, “केसीआर यांनी केवळ निवडणुकीपुरती आश्वासने न देता अथवा केवळ राजकीय दृष्टिकोन ठेवून कार्य न करता जनहित व राष्ट्रहित नजरेसमोर ठेवून व्यापक कार्य आपल्या राज्यात केलं आहे. केसीआर यांनी गेल्या १४ वर्षांत तेलंगणा राज्यात विकासाची गंगा आणली आहे.”
हेही वाचा : आज लोकसभेची निवडणूक झाली तर कोणाची येणार सत्ता? जनतेचा पाठिंबा नेमका कोणाला? जाणून घ्या
“कृषीधोरण, जनधोरण, सिंचन योजना, गरीब व वंचितांसाठी आखलेल्या विविध योजना व शिक्षण पद्धती या संपूर्ण देशासाठी मार्गदर्शन व आदर्शवत आहेत. त्यांच्या या योजना व कार्यपद्धती याविषयी प्रदीर्घ चर्चा झाली. केसीआर हे केवळ आपल्या राज्यापुरते मर्यादित न राहता इतर राज्यांच्या विकासाचा व त्यामाध्यमातून संपूर्ण राष्ट्राचा विकास साधण्याचा दूरगामी दृष्टिकोन ठेवणारे अत्यंत ध्येयवादी व्यक्तिमत्त्व आहेत,” असं संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं.