एपी, टोकियो

जपानच्या पार्लमेंटने अतिपुराणमतवादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सनाई तकाइची यांची पंतप्रधान म्हणून मंगळवारी निवड केली. जपानमधील त्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. त्यांच्या निवडीमुळे प्रशासनावर येत्या काळात उजव्या विचारसरणीचा अधिक प्रभाव राहण्याची शक्यता आहे.

तकाइची शिगेरू इशिबा यांची जागा घेतील. जपानमधील तीन महिन्यांची राजकीय अस्थिरता यामुळे संपुष्टात येईल. जपानमध्ये जुलै महिन्यात उदारमतवादी लोकशाही पक्षाचा पराभव झाल्यानंतर राजकीय पोकळी निर्माण झाली होती. इशिबा यांनी त्यांच्या मंत्रिमंडळासह राजीनामा देऊन तकाइची यांना सरकारस्थापनेचा मार्ग मोकळा करून दिला. इशिबा केवळ एक वर्ष पंतप्रधान म्हणून होते.

संसदेच्या कनिष्ठ सभागृहात झालेल्या मतदानात तकाइची यांना २३७ मते मिळाली. त्यांना बहुमताला आवश्यक मतांपेक्षा चार मते अधिक मिळाली. विरोधक योशिकोको नोदा यांना १४९ मते मिळाली. या विजयामुळे तकाइची यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. विजयी घोषित केल्यानंतर तकाइची यांना सर्वांना अभिवादन केले.

तकाइची यांची निवड झाली असली, तरी आघाडी असल्याने आणि मित्रपक्षाचा भरवसा नसल्याने त्यांना सर्वांशी जुळवून घेऊन पावले टाकावी लागणार आहेत.

जपानच्या राजकारणात अतिपुराणमतवादी आणि पुरुषांचे वर्चस्व असलेल्या मानसिकतेचा प्रभाव राहिला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जपानमध्ये ‘लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी’चे वर्चस्व राहिले आहे. जपानच्या कनिष्ठ सभागृहात सुमारे १५ टक्के जागांवर महिला आहेत. मात्र,‘एलडीपी’तून निवडून आलेल्या महिलांना त्यांनी लैंगिक समानता किंवा विविधतेबद्दल मतप्रदर्शन केले, तर मंत्रिपदापासून बऱ्याचदा दूर ठेवले जात असे. तकाइची यांनी ही बाब ओळखून यावर फारसे भाष्य केलेले नाही. या पक्षाचेही नेतृत्व आता तकाइची करणार आहेत.

कोण आहेत तकाइची?

सनाई तकाइची (वय ६४) सर्वात प्रथम १९९३मध्ये संसदेत निवडून आल्या. पक्ष आणि सरकारमध्ये त्यांनी महत्त्वाची पदे भूषवली. पुरुषी वर्चस्व असलेल्या राजकारणात त्यांनी लिंगसमानतेचा मुद्दा निवडणूक प्रचारात फारसा उपस्थित केला नाही. मात्र, पक्षाच्या अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर त्यांनी ‘आता ‘एलडीपी’ला पहिल्या महिला अध्यक्ष लाभल्या आहेत. पक्षाचे चित्र आता थोडेसे बदलेल,’ असे वक्तव्य केले. संसदेत महिलांचे प्रतिनिधित्व वाढविण्याची हमी त्यांनी दिली आहे. मात्र, सम्राटाच्या पुरुष वारशाचे त्यांनी समर्थन केले आहे. समलिंगी विवाहाला त्यांनी विरोध केला आहे. ब्रिटनच्या माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांची त्या स्तुती करतात. तसेच, जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या जपानबद्दलच्या पुराणमतवादी उद्दिष्टांच्या त्या समर्थक आहेत.