नवी दिल्ली : मद्या धोरण घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदिया यांच्या जामिनावर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र सुनावणीपूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय कुमार यांनी या खटल्यातून माघार घेतल्याने सिसोदिया यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आता पुढील आठवड्यात नवीन खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी करण्याचे आदेश दिले आहेत. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया फेब्रुवारी २०२३ पासून तुरुंगात आहेत. हेही वाचा >>> माजी अग्निविरांसाठी आनंदाची बातमी; सशस्त्र दलात १० टक्के पदे राखीव; केंद्रीय गृहमंत्र्यालयाची मोठी घोषणा! न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या खंडपीठाने सांगितले की, मद्या धोरण घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) यांनी दाखल केलेल्या खटल्यांमध्ये सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर नव्याने विचार करण्यात येत आहे. दोन स्वतंत्र याचिकांवर न्यायमूर्ती कुमार सदस्य नसलेल्या खंडपीठामार्फत सुनावणी होणार आहे. खटल्याची सुनावणी सुरू होताच न्यायमूर्ती खन्ना म्हणाले, ‘‘वैयक्तिक कारणांमुळे संजय कुमार प्रकरणावर सुनावणी करू इच्छित नाहीत. दोन्ही प्रकरणांची सुनावणी अद्याप सुरू झालेली नाही. १५ जुलै रोजी दुसरे खंडपीठ यावर विचार करेल, असे खंडपीठाने सांगितले. सिसोदिया यांच्या जामिनावर अर्जावर सुनावणी घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने ८ जुलै सहमती दर्शवली होती. सिसोदिया यांचे वकील अभिषेक सिंघवी यांनी खंडपीठाला या प्रकरणाची तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केलीहोती. या खटल्यांमध्ये जामीन मिळावा यासाठी याचिकाही दाखल करण्यात आली होती. गुरुवारीही सुनावणी न झाल्याने सिसोदिया यांना जामिनाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.