चिंगडाओ (चीन)
पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाबाबत भारताला वाटणारी चिंता आणि पहलगाम हल्ल्याचा स्पष्ट उल्लेख नसल्यामुळे शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी जोरदार टीका केली. संयुक्त जाहीरनाम्यावर स्वाक्षरी करण्यासही त्यांनी नकार दिल्यामुळे परिषदेचा समारोप संयुक्त जाहीरनाम्याशिवाय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राजनाथ सिंह यांनी दहशतवादाविरुद्ध भारताची भूमिका ठामपणे मांडून ‘एससीओ’च्या सदस्य देशांना दहशतवादविरोधी लढ्यासाठी आणि त्यातील दुटप्पीपणा थांबविण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. या परिषदेला पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ आणि चीनचे संरक्षणमंत्री डोंग जूनदेखील उपस्थित होते. त्यांच्या समक्षच संरक्षणमंत्र्यांनी दहशतवादावरून खडेबोल सुनावले. मात्र जाहीरनाम्याच्या आराखड्यात पहलगाम हल्ल्याचा उल्लेख नव्हता. तसेच, पाकिस्तानपुरस्कृत सीमापार दहशतवादाबाबत भारताच्या भूमिकेचाही उल्लेख नव्हता. यावर सिंह म्हणाले, की शांतता आणि समृद्धी दहशतवादाबरोबर आणि अराष्ट्रीय घटकांमध्ये, दहशतवादी गटांमध्ये महासंहारक शस्त्रांचा प्रसार करून राहू शकत
नाही. या आव्हानांचा सामना करण्यासाठी निर्णायक कृतीची आवश्यकता आहे. दहशतवादाचे पुरस्कर्ते, पोशिंदे आणि वापरकर्त्यांची संकुचित, स्वार्थी उद्दिष्टे पूर्ण करणाऱ्यांना त्याचे परिणाम भोगावे लागणे आवश्यक आहे असल्याचे संरक्षणमंत्र्यांनी खडसावले.
रशिया, बेलारूस संरक्षणमंत्र्यांशी चर्चा
राजनाथ सिंह यांनी गुरुवारी बेलारूसचे संरक्षणमंत्री विक्टॉर क्रेनिन यांची भेट घेतली. द्विस्तरावरील संरक्षणसंबंध अधिक मजबूत करण्यावर उभयतांत चर्चा झाली. रशियाचे संरक्षणमंत्री अँड्रे बिलोसोव्ह यांच्याशीही प्रादेशिक सुरक्षा आणि द्विस्तरावरील संरक्षण संबंधांवर त्यांनी चर्चा केली.
जाहीरनामा का नाही?
●‘एससीओ’ परिषदांच्या अखेरीस एक संयुक्त निवेदन जारी केले जाते.
●मात्र या निवेदनावर सर्व सदस्य राष्ट्रांचे एकमत असणे आवश्यक आहे.
●भारताने स्वाक्षरीस नकार दिल्यामुळे या परिषोचा संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध झाला नाही.