मुंबई : ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी गीतेतील श्रीकृष्णाचा अर्जुनाला संदेश म्हणजे जिहाद असल्याचे केलेले वक्तव्य अत्यंत दु:खदायक असून हिंदू समाज आणि देश हे कधीही सहन करणार नाही. त्यांनी देशाची आणि हिंदू धर्मियांची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी केली.
शिवराज पाटील यांनी नवी दिल्लीत गुरुवारी एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेल्या उपदेशांची तुलना कथितरित्या जिहादशी केल्याने वाद निर्माण झाला आहे. दुर्योधनाने केले तो जिहाद होता व श्रीकृष्णाने अर्जुनाला युध्दापासून पळ न काढता सामोरे जाण्यास सांगितले, तो जिहाद नव्हता. सर्वच देशांमध्ये युध्दे झाली असून सर्व धर्मामध्ये त्याचा उल्लेख आहे, असे स्पष्टीकरण पाटील यांनी केले आहे.
मात्र, त्याबाबत टीका करताना बावनकुळे म्हणाले, शिवराज पाटील हे लोकसभा अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री होते. त्या पदांचाही त्यांनी अपमान केला आहे. त्यांनी केलेले विधान हिंदू संस्कृती आणि देशाचा अवमान करणारे आहे.