Donald Trump on India-Pak Conflict: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत – पाकिस्तान संघर्षावर भाष्य केले आहे. मे महिन्यात पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले होते. हे ऑपरेशन थांबविण्यासाठी आपण मध्यस्थी केल्याचा दावा ट्रम्प यांनी आजवर अनेकदा केला आहे. भारताने या दाव्याला फेटाळून लावले असतानाही ट्रम्प वारंवार संघर्षात यशस्वी मध्यस्थी केल्याचे सांगत आहेत. नुकतेच जपानच्या दौऱ्यावर असताना जागतिक नेत्यांशी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा याचा पुनरुच्चार केला.

सात लढाऊ विमाने पाडली

मंगळवारी जपानच्या दौऱ्यावर असताना जागतिक व्यापारी नेते आणि अमेरिकन सैन्यांसमोर डिनरमध्ये बोलत असताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, मे महिन्यात व्यापाराच्या माध्यमातून मी भारत-पाकिस्तानमधील संघर्ष थांबवू शकलो. या माध्यमातून मी जगाची मोठी सेवा केली आहे. या संघर्षात सात नवीकोरी आणि सुंदर लढाऊ विमाने पाडली गेली, असाही दावा यावेळी ट्रम्प यांनी केला.

डोनाल्ड ट्रम्प पुढे म्हणाले, मी आतापर्यंत जितके युद्ध थांबवले आहेत, ते सर्व टॅरिफच्या जीवावर थांबवले. व्यापार आणि टॅरिफच्या माध्यमातून मी जगाची मोठी सेवा केली आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन अण्वस्त्रधारी देश आहेत. व्यापाराच्या माध्यमातून मी त्यांचा संघर्ष थांबवू शकलो. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी दावा केला होता की, त्यांच्या टॅरिफच्या धमक्यांद्वारे त्यांनी जगभरातील आठ जागतिक संघर्षात यशस्वी मध्यस्थी केली.

मंगळवारी जपानमध्ये बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे फील्ड मार्शल असीम मुनीर यांच्याबद्दल बोलताना ट्रम्प म्हणाले, जर तुम्ही भारत आणि पाकिस्तानच्या संघर्षाकडे पाहिले तर ते एकमेकांवर हल्ला करत होते. या संघर्षात सात नवीकोरी आणि सुंदर अशी विमाने पाडण्यात आली. अणुशक्ती असलेले दोन मोठे देश एकमेकांसमोर उभे ठाकले होते. मी पंतप्रधान मोदींना म्हणालो, तुम्ही खूप चांगले व्यक्ती आहात. तसेच पाकिस्तानचे फील्ड मार्शल असीम मुनीर यांना सांगितले की, जर तुम्ही असेच लढत असाल तर तुमच्याबरोबर आम्ही व्यापार करणार नाही.