Sheikh Hasina : बांगलादेशात अभूतपूर्व राजकीय सत्तापालट झाला आहे. १५ वर्षांहून अधिक काळ सत्तेवर असलेल्या शेख हसीना यांनी तडकाफडकी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी भारतात पलायन केले. आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशात परिस्थिती चिघळत गेल्याने शेख हसीना यांना त्यांचा देश सोडावा लागला. देश सोडण्याचा निर्णय अवघ्या ४५ मिनिटांत त्यांना घ्यावा लागला. एवढंच नव्हे तर देश सोडण्यासाठी त्यांना फक्त ४५ मिनिटेच देण्यात आली होती. राजीनामा देण्यापासून देश सोडण्याच्या या काळात काय नाट्यमय घडामोडी घडल्या ते पाहूयात. बांगलादेशातील वृत्तपत्र प्रोथोम ऑलोने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बांगलादेशात परिस्थिती चिघळत गेल्याने शेख हसीना यांची प्रचंड धावपळ सुरू होती. मॅरेथॉन बैठका सुरू होत्या. ढाकास्थित वृत्तपत्र प्रथम आलोच्या वृत्तानुसार, शेख हसीना यांनी शेवटपर्यंत आपली सत्ता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याकरता त्यांनी बळाचाही वापर करण्याचा प्रयत्न केला. देशातून पळून जाण्यापूर्वी त्यांनी सोमवारी सकाळी १०.३० वाजल्यापासून सुमारे एक तास विविध कायदा अंमलबजावणी आणि संरक्षण दलातील उच्च अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव आणला. याच काळात गोनोभोबोनकडे जाणारे ढाक्याच्या रस्त्यांवर गर्दी जमायला सुरुवात झाली. या रस्त्यांवर ऐतिहासिक गर्दी जमा झाली होती.

आंदोलनकर्त्यांविरोधात बळाचा वापर करा

रविवारी बांगलादेशात हिंसाचार उफाळला होता. यामध्ये ९८ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे त्यांनी तेव्हाच गोनोभोबोनवर हल्ला करण्याची शपथ घेतली होती. शेख हसीना यांनी सुरक्षा दलांना अधिक शक्ती वापरण्याचे आवाहन केले. त्यांनी सशस्त्र सेना आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वापर करून विद्यार्थ्यांच्या नेतृत्त्वाखालील निदर्शने आणि अशांतता रोखू शकल्या नाहीत.

हेही वाचा >> PM Sheikh Hasina Resign Live Updates : बांगलादेश संसद बरखास्त, नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस स्वीकारणार अंतरिम सरकारच्या मुख्य सल्लागाराची सूत्रे!

राजीनामा द्या, असं लष्कराने आधीच सांगितलं होतं

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अवामी लीगच्या काही नेत्यांनी रविवारीच देशाची सत्ता लष्कराच्या हाती सोपवण्याची विनंती शेख हसीना यांच्याकडे केली होती. परंतु, त्यावेळी शेख हसीना यांनी हा प्रस्ताव धुडकावून लावला. सत्तेवरून पायउतार होण्यापेक्षा त्यांनी देशात संचारबंदी लागू केली. इंटरनेट सेवा खंडित केली. परिणामी बांगलादेशात अराजकता पसरली. आंदोलकांवर नियंत्रण मिळवणं सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या हाताबाहेर गेलं.

त्या शेवटच्या दोन तासांत काय काय घडलं?

देशात संचारबंदी लागू असतानाही आंदोलकांनी सकाळी ९ वाजल्यापासूनच एकत्र जमायला सुरुवात केली. तासाभरात लाखो लोक ढाक्याच्या रस्त्यांवर उतरले. विविध एजन्सींच्या उच्च स्तरीय सूत्रांनी प्रथम आलोला खुलासा केला की, सकाळी साडेदहाच्या सुमारास लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख आणि पोलीस महानिरीक्षक (IGP) यांना पंतप्रधानांच्या निवासस्थानी बोलावण्यात आले होते.

परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यास अपयशी ठरल्याने शेख हसीना यांनी सुरक्षा दलांवर नाराजीही व्यक्त केली. आंदोलकांविरोधात कठोर कारवाई का केली नाही? असा सवालही त्यांनी विचारला. शेख हसीना यांनी सुरक्षा दलांवर विश्वास ठेवला होता. त्यासाठीच त्यांची उच्च पदावर नियुक्त केली होती. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने अतिरिक्त पोलीस फौजफाटा मागवण्यात आला. परंतु, तरीही दिर्घकाळ ही परिस्थिती हाताळणं असह्य झाले. केवळ बळाच्या जोरावर परिस्थिती नियंत्रणात आणता येणार नाही, असे उच्च अधिकाऱ्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु शेख हसीना ते स्वीकारण्यास तयार नव्हत्या, असे प्रोथोम ऑलोच्या अहवालात म्हटले आहे.

शेख हसीना यांनी राजीनामा द्यावा म्हणून अधिकाऱ्यांची बहीण आणि मुलाकडे धाव

देशातील परिस्थिती चिघळत गेल्याने काही अधिकारी शेख हसीना यांच्या बहीण रेहाना यांना भेटले. त्यांनी रेहाना यांना परिस्थितीचे गांभीर्य हसीनाला सांगण्याची विनंती केली. रेहाना यांनी ही परिस्थिती शेख हसीना यांना समजावली. परंतु, शेख हसीना तरीही त्यांच्या निर्णयापासून मागे हटायला तयार नव्हत्या. यानंतर, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने हसीना यांचा मुलगा सजीब वाझेद जॉय यांच्याशीही चर्चा केली. ते परदेशात राहतात. अधिकाऱ्यांनी देशातील परिस्थिती विषद केल्यानंतर सजीब वाझेद यांनी शेख हसीना यांना राजीनामा देण्यास गळ घातली. सजीब वाझेद यांच्या विनंतीनंतर शेख हसीना यांनी राजीनामा देण्यास होकार दिला.

भाषण रेकॉर्ड करायलाही वेळ मिळाला नाही

दरम्यान, राजीनामा दिल्यानंतर देश सोडण्याचाही निर्णय घेण्यात आला. परंतु, देश सोडण्याआधी शेख हसीना यांना देशाला संबोधित करायचं होतं. त्यांना त्यांचं भाषण रेकॉर्ड करायचं होतं. परंतु, त्यांना भाषणही रेकॉर्ड करण्याची मुभा देण्यात आली नाही. कारण, तोपर्यंत शहाबाग आणि उत्तरा येथील लोकलमधून असंख्य विद्यार्थी गोनोभोबोनकडे कूच करत असल्याचे गुप्तचर अहवालांनी सूचित केले. गर्दीचा लोट पुढच्या ४५ मिनिटांत गोनोभोबोनपर्यंत पोहोचू शकणार होता. त्यामुळे शेख हसीना यांना भाषण रेकॉर्ड करण्यास वेळ मिळाला नाही.

देश सोडण्यासाठी दिली फक्त ४५ मिनिटे

एवढंच नव्हे तर लष्कराने त्यांना देश सोडण्यासाठी केवळ ४५ मिनिटे दिली. शेख हसीना त्यांची धाकटी बहीण रेहाना यांच्यासह त्यांच्या अधिकृत निवासस्थानाशेजारी असलेल्या तेजगाव हवाई तळावरील हेलिपॅडवर पोहोचल्या. त्यांचे काही सामान विमानात ठेवले गेले.

आधी राष्ट्रपतींकडे गेल्या मग देश सोडला

त्यानंतर शेख हसीना राष्ट्रपतींच्या निवासस्थानी गोनोभोबोन येथे गेल्या. जिथे तिने त्यांचा औपचारिक राजीनामा दिला आणि बांगलादेशातील १५ वर्षांच्या प्रदीर्घ राजवटीचा अंत केला. अहवालात म्हटले आहे की ढाक्याहून आलेले हेलिकॉप्टर, हसीना आणि त्यांच्या बहिणीला घेऊन, भारतीय हवाई हद्दीत प्रवेश केल्यानंतर काही वेळातच त्रिपुरातील ईशान्य शहर आगरतळा येथील सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) हेलिपॅडवर उतरले.

नंतर, शेख हसीना यांचे भारतीय वायुसेनेच्या गाझियाबाद येथील हिंडन हवाई तळावर सायंकाळी ५.३६ वाजता आगमन झाले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह भारतीय अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. त्या इथून लंडनला जाण्याच्या तयारीत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sheikh hasina how did 15 years of power go in 45 minutes dramatic developments at sheikh hasinas residence sgk
Show comments