Sheikh Hasina Reveals Assassination Plot : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी सत्तेवरून पायउतार होत आपल्या देशातून पलायन केलं आहे. त्यांनी भारतात आश्रय घेतला असून सध्या भारतातील अज्ञात ठिकाणी वास्तव्यास आहेत. दरम्यान, शेख हसीना यांनी त्यांच्या देशातील सत्तांतरावर पहिल्यांदाच मोठं वक्तव्य केलं आहे. शेख हसीना म्हणाल्या की त्यांना व त्यांची धाकटी बहीण शेख रेहाना यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. मृत्यूला हुलकावणी देत आम्ही तिथून निसटलो. शेख हसीना यांनी शुक्रवारी (१७ जानेवारी) रात्री आवामी लीग पार्टीच्या फेसबूक पेजवरून त्यांनी त्यांचा ऑडिओ संदेश जारी केला. यामधून त्यांनी अनेक महत्त्वाची वक्तव्ये केली आहेत. त्या म्हणाल्या, “मी व रेहाना थोडक्यात बचावलो. २० ते २५ मिनिटांच्या फरकाने आमचा जीव वाचला. अन्यथा आमचा बळी गेला असता”.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात बांगलादेशमध्ये विद्यार्थी आंदोलन पेटलं. या आंदोलनात अनेक संघटना व विरोधी पक्ष देखील सहभागी झाले होते. हे आंदोलन इतकं हिंसक बनलं की बांगलादेशमधील विविध भागात दंगली उसळल्या. देशातील स्थिती शेख हसीना यांच्या नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे व जनतेचा शेख हसीना यांच्याविरोधात उद्रेक पाहून हसीना यांनी बांगलादेशमधून पलायन केलं. या काळात बांगलादेशात झालेल्या हिंसाचारात ६०० हून (सरकारने जाहीर केलेली आकडेवारी) अधिक लोकांचा बळी गेला आहे. शेख हसीना यांनी पलायन केल्यानंतर मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार गठित करण्यात आलं आहे. युनूस हेच सध्या बांगलादेशचा कारभार हाकण्याचं काम करत आहेत.

शेख हसीना यांनी नेमकं काय सांगितलं?

दरम्यान, बांगलादेशमधील हिंसाचार व त्यानंतर केलेल्या पलायलनावर शेख हसीना यांनी भाष्य केलं आहे. त्या म्हणाल्या की “मला मारण्यासाठी अनेकदा कट रचण्यात आला. २१ ऑगस्ट रोजी माझी हत्या करण्याचा प्रयत्न झाला होता. कोटलीपारा येथील बॉम्बस्फोटातून मी थोडक्यात बचावले. ५ ऑगस्ट रोजी देखील मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, अल्लाहच्चा आशीर्वादामुळे मी वाचले. त्यांनी (विरोधक) मला मारण्याचा अनेकदा प्रयत्न केल्याचं तुम्ही (जनता) पाहिलंच असेल. परंतु, अल्लाहच्या कृपेने मी अजूनही जिवंत आहे. कदाचित मी काहीतरी दुसरं करावं अशी अल्लाहची इच्छा असेल. परंतु, मला माझ्या देशाची अवस्था पाहून खूप वेदना होत आहेत. माझ्या देशापासून दूर, माझ्या लोकांपासून दूर राहणं, हे जगणं फार अवघड आहे. सगळं काही जळून खाक झालं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sheikh hasina says we escaped death by 20 25 minutes former bangladesh pm reveals assassination plot asc