Crime News : देशभरात घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटना कमी होण्यासाठी सातत्याने पावलं उचलले जातात. मात्र, तरीही गुन्हेगारीच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. आता त्रिपुराच्या पश्चिम त्रिपुरा जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. एका महिलेने तिच्या पतीच्या अंगावर अ‍ॅसिड टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत संबंधित व्यक्तीचा चेहरा मोठ्या प्रमाणात जळाला असून त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

नेमकं काय घडलं?

पश्चिम त्रिपुरा जिल्ह्यातील एक महिला आणि तिचा पती दुचारीवरून जात होते. मात्र, यावेळी दुचाकीवर पाठिमागे बसलेल्या पत्नीने पतीच्या अंगावर अचानक अ‍ॅसिड ओतल्याची माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली आहे. या घटनेत पती गंभीर जखमी झाला आहे. सदर व्यक्ती शेतकरी असून त्याच्या चेहऱ्यावर आणि मानेवर जळालेल्या जखमा झाल्या आहेत. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी सांगितली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

पोलिसांनी काय म्हटलं?

सिधाई पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी हिमाद्री सरकार यांनी सांगितलं की, “देबबर्मा असं गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीच नाव आहे. तो आणि त्याचे पत्नी बुधवारी दुचाकीवरून चांदपूरकडे जात होते. अचानक त्याच्या पत्नीने पतीवर अ‍ॅसिड ओतलं. त्यानंतर त्याने बाईक थांबवली. यावेळी त्याला तीव्र वेदना झाल्यामुळे तो मोठमोठ्याने आरडाओरड करू लागला. मात्र, नेमकं काय घडलं? याबाबत त्याला आधी काहीही समजलं नाही.

जेव्हा तो मदतीसाठी ओरडू लागला, तेव्हा त्याच्या पत्नीने त्याच्यावर पुन्हा आणखी अ‍ॅसिड ओतण्याचा प्रयत्न केला. पण घटनास्थळाच्या आजूबाजूला असलेल्या काही नागरिकांनी मदत करत पत्नीला पतीवर पुन्हा अ‍ॅसिड ओतण्यापासून वाचवलं. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी पुढे सांगितलं की, ती महिला घरगुती हिंसाचारामुळे वैतागली होती आणि तिने त्यामधून तिच्या पतीवर अ‍ॅसिड हल्ला केला असावा असा अंदाज आहे. पीडित व्यक्तीवर अद्याप कोणतीही औपचारिक तक्रार दाखल झालेली नाही, कारण त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच आम्ही घटनेवर लक्ष ठेवून आहोत. आम्ही शोध घेतला आणि असे दिसून आले की अ‍ॅसिड हल्ल्यानंतर महिला फरार झालेली आहे, असं पोलिसांनी सांगितलं असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.