shraddha walker murder case aftab investigation after narco completed in tihar jail zws 70 | Loksatta

श्रद्धा वालकर हत्या प्रकरण : आफताबच्या ‘नार्को’नंतरची चौकशी तिहार कारागृहात पूर्ण

सकाळी साडेअकराच्या सुमारास तज्ज्ञांचे चौकशी पथक तुरुंगात पोहोचले. हे सत्र सुमारे एक तास ४० मिनिटे चालले.

श्रद्धा वालकर हत्या प्रकरण : आफताबच्या ‘नार्को’नंतरची चौकशी तिहार कारागृहात पूर्ण
श्रद्धा वालकर हत्या प्रकरण

नवी दिल्ली : श्रद्धा वालकर खूनप्रकरणातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याच्या-नार्को चाचणीनंतरचे विश्लेषण सत्र शुक्रवारी दोन तासांत पूर्ण झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे (एफएसएल) चार सदस्यीय पथक आणि तपास अधिकारी नवी दिल्लीतील तिहार कारागृहात आफताबच्या नार्को चाचणीनंतरची चौकशीसाठी आले होते.

मध्यवर्ती कारागृह क्रमांक ४ मध्ये ही चौकशी सकाळी दहापासून सुरू होऊन दुपारी तीनपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र त्यास विलंब झाला. सकाळी साडेअकराच्या सुमारास तज्ज्ञांचे चौकशी पथक तुरुंगात पोहोचले. हे सत्र सुमारे एक तास ४० मिनिटे चालले. या सत्रानंतर आफताबने गुरुवारी नार्को विश्लेषण चाचणीत दिलेल्या उत्तरांची माहिती त्याला देण्यात आली. त्याच्या प्रवासातील जोखीम लक्षात घेऊन न्यायालयाच्या आदेशानुसार ही व्यवस्था कारागृहात करण्यात आली होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

तत्पूर्वी गुरुवारी रोहिणी रुग्णालयात दोन तासांहून अधिक काळ चाललेली पूनावाला यांची नार्को विश्लेषण चाचणी यशस्वी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ‘एफएसएल’च्या सूत्रांनी यापूर्वी सांगितले होते, की आरोपीने नार्को चाचणी आणि यापूर्वी घेतलेल्या पॉलिग्राफ चाचणी दरम्यान दिलेल्या उत्तरांचे विश्लेषण केले जाईल. आफताबने दिलेल्या उत्तरांची माहिती त्याला दिली जाईल.

दिल्ली पोलिसांनी पूनावालाच्या नार्को चाचणीची मागणी केली होती. कारण पोलिसांच्या चौकशीदरम्यान त्याची उत्तरे दिशाभूल करणारी होती, असे पोलिसांचे म्हणणे होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आरोपीच्या संमतीशिवाय त्याची नार्को, ब्रेन मॅपिंग अथवा पॉलिग्राफ चाचणी करता येत नाही. या चाचणीदरम्यान आरोपीचा जबाब न्यायालयात प्राथमिक पुरावा म्हणून ग्राह्य धरला जात नाही. मात्र एखाद्या विशिष्ट परिस्थितीत खटल्याचे स्वरूप व तथ्यानुसार न्यायालय या चाचणीतील जबाब न्यायालय ग्राह्य धरू शकते. आफताबला १२ नोव्हेंबर रोजी अटक करून पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यात १७ नोव्हेंबर रोजी पाच दिवसांची वाढ करण्यात आली होती. २६ नोव्हेंबर रोजी न्यायालयाने त्यांना १३ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 04:25 IST
Next Story
वेदमंत्रांच्या घोषात मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदाची सूत्रे! ; हंसराज अहिर यांच्याकडे पदभार