Uttar Pradesh : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीने त्याच्या गर्भवती पत्नीला एका खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र, पैशाअभावी खासगी रुग्णालयात त्या महिलेवर उपचार करण्यास नकार देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. जेव्हा त्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, तेव्हा ती महिला प्रसूती वेदनेने ओरडत होती. मात्र, त्या महिलेचे नातेवाईक रुग्णालयात तात्काळ पैसे भरू न शकल्यामुळे रुग्णालयातील डॉक्टरांनी त्या महिलेवर उपचार करण्यास नकार दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या सर्व गोंधळात नवजात बाळाचा जीव गेला. त्यानंतर त्या बाळाचे वडील आपल्या मृत बाळाची बॉडी पिशवीत घेऊन थेट लखीमपूर खेरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले आणि ‘साहेब, माझ्या बाळाला जिवंत करा ना’, अशी हृदयद्रावक विनवणी करू लागले. मृत बाळाची बॉडी पिशवीत पाहून सरकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनाही धक्का बसला. दरम्यान, त्यानंतर संबंधित रुग्णालयावर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.

वृत्तानुसार, नवजात बाळाचे वडील विपिन गुप्ता यांनी असा आरोप केला आहे की, रुग्णालयाने अधिकचे पैसे मागितले आणि प्रसूतीला उशीर केला. दरम्यान, जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी शुक्रवारी एक पोस्ट शेअर करत म्हटलं की, “नवजात बाळाच्या मृत्यूच्या प्रकरणात जिल्हा प्रशासनाने संबंधित रुग्णालयावर कारवाई करत ते सील केलं आहे. तसेच दाखल रुग्णांना जिल्हा महिला रुग्णालयात दाखल केलं आहे.

एएनआयशी बोलताना विपिन गुप्ता यांनी म्हटलं की, “संबंधित रुग्णालयाने नैसर्गिक प्रसूतीसाठी १०,००० रुपये मागितले आणि सी-सेक्शन प्रसूतीसाठी १२,००० रुपये मागितले. मात्र, त्यांच्या पत्नीला जेव्हा प्रसूतीची तीव्र वेदना होत होती तेव्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी या पैशांमध्ये आणखी वाढ केली”, असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच मी त्यांना प्रसूती करण्यास सांगितलं होतं आणि अधिक पैशांची व्यवस्था करेन असंही सांगितलं होतं. मात्र, तरीही त्यांनी आधी संपू्र्ण पैशांची मागणी केली, असा आरोप विपिन गुप्ता यांनी केला आहे.

दरम्यान, गुप्ता यांनी असाही आरोप केला की, नवजात बाळाच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीलाही बाहेर काढण्यात आलं. ते म्हणाले की, “माझ्या नवजात बाळाचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी माझ्या पत्नीला बाहेर काढून दिलं. त्यानंतर मी डीएमकडे गेलो आणि ते माझ्याबरोबर या ठिकाणी आले. मी माझ्या मृत बाळाला एका पिशवीत घेऊन त्यांच्याकडे गेलो होतो, असं गुप्ता यांनी सांगितलं आहे.