‘स्मार्ट’ शहरांच्या निर्मितीसाठी येणारी आव्हाने लक्षात घेता प्रत्येक ‘स्मार्ट’ शहर योजनेसाठी सरकार ‘स्पेशल पर्पज व्हेईकल’ सुरू करणार असल्याचे केंद्रीय नगर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी मंगळवारी एका कार्यक्रमात सांगितले. ही योजना पुढील महिन्यापासून सुरू होणार असल्याचेदेखील त्यांनी संगितले. ‘द इंडियन एक्स्प्रेस समूह’ आणि ‘न्यूज एक्स’ वृत्तवाहिनीने संयुक्तरित्या आयोजित केलेल्या ‘डिजिटल इंडिया डायलॉग’ कार्यक्रमात व्यंकय्या नायडूंनी आपले विचार मांडले.
ते म्हणाले की, ‘स्मार्ट शहर’ आणि ‘नवीन शहर विकास’ योजना ५०० शहरांना लागू करण्यात येईल. ‘पॅन सिटी’ योजनेअंतर्गत येणाऱ्या कुशल सार्वजनिक परिवहनप्रणाली आणि ई-गव्हर्नंन्ससारख्या गोष्टींना या योजनांनमध्ये प्राधान्य देण्यात येईल. त्याचप्रमाणे माहिती तंत्रज्ञान शहराच्या प्रशासकीय कारभारात महत्वाची भूमिका बजावणार असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. त्यांनी शहरांच्या सध्याच्या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, शहराच्या मूळ रचनेत आणि अन्य सोयीसुविधांमध्ये सुधारणा आणल्यास शहरात राहणाऱ्या लोकांच्या जीवनावर याचा चांगला परिणाम होईल. दूरगामी परिणाम साधणारा योग्य आराखडा तयार करून विकास साधणे हा सरकारचा ‘स्मार्ट’ शहरांच्या निर्मितीमागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील महिन्यात ‘स्मार्ट’ शहर योजना सुरू करण्याचे विचाराधीन असल्याचे ते म्हणाले. ‘डिजिटल इंडिया डायलॉग’मध्ये सहभागी झालेल्या अन्य महत्वाच्या व्यक्तिंमध्ये औद्योगिक विकास विभागाचे सचिव अमिताभ कांत, जागतिक बँकेचे भारतातील संचालक ओनो रूल, निती आयोगाचे सदस्य विवेक ओबेरॉय, माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव रामसेवक शर्मा आणि ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्युशनचे प्रधान संचालक पियुष सोमाणी हे उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 25th Mar 2015 रोजी प्रकाशित
‘स्मार्ट सिटी’ योजना पुढील महिन्यापासून – व्यंकय्या नायडू
'स्मार्ट' शहरांच्या निर्मितीसाठी येणारी आव्हाने लक्षात घेता प्रत्येक 'स्मार्ट' शहर योजनेसाठी सरकार 'स्पेशल पर्पज व्हेईकल' सुरू करणार असल्याचे केंद्रीय नगर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी मंगळवारी एका कार्यक्रमात सांगितले.

First published on: 25-03-2015 at 01:21 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smart cities work will begin soon 500 brownfield projects to take off venkaiah naidu