नवी दिल्ली : सामाजिक आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या अटकेविरोधात त्यांची पत्नी गीतांजली अंगमो यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे. वांगचुक यांना २६ सप्टेंबरला राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करण्यात आली असून त्यांची तातडीने सुटका करण्यात यावी अशी मागणी अंगमो यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केली आहे.

सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणीसाठी घेतल्या जाणाऱ्या खटल्यांच्या यादीमध्ये गीतांजली अंगमो यांच्या याचिकेचाही समावेश आहे. न्या. अरविंद कुमार आणि न्या. एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी अंगमो यांची याचिका सूचिबद्ध करण्यात आली आहे. लडाखला राज्याचा दर्जा मिळावा, तसेच राज्यघटनेच्या सहाव्या परिशिष्टामध्ये समावेश करण्यात यावा, या मागण्यांसाठी वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान हिंसाचार होऊन चार जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर वांगचुक यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात आली.