पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱया दिवशी लोकसभेमध्ये गोंधळ घालणाऱय़ा विरोधी पक्षांच्या सदस्यांना लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी शिस्तभंगाची कारवाई करण्याची ताकीद दिली. मात्र, त्यामुळे विरोधकांमध्ये आणखीनच असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आणि त्यांनी व्हेलमध्ये जमून घोषणाबाजी सुरू केली.
ललित मोदी यांना मदत केल्यावरून परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्यावर भाजपने कारवाई करावी, अशी मागणी मंगळवारपासून विरोधकांनी लावून धरली आहे. याच मागणीमुळे बुधवारी प्रश्नोत्तराच्या तासावेळी सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले होते. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर सुमित्रा महाजन यांनी सभागृहाची प्रतिष्ठा राखणे हे सर्वांचेच प्रथम कर्तव्य असल्याचे सांगितले. त्याचवेळी त्यांनी सभागृहात काळ्या फिती लावून येणे आणि कागदी फलक झळकावणे योग्य नसल्याचेही विरोधकांच्या लक्षात आणून दिले. सभागृहात अशा पद्धतीने फलक दाखवून कामकाजात व्यत्यय आणणाऱयांवर गरज पडल्यास कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. विरोधकांनी याचा जोरदार विरोध केला. व्हेलमध्ये जमून त्यांनी पुन्हा घोषणाबाजी करीत, फलक दाखविल्यानंतर अध्यक्षांनी कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केले.
ललित मोदी प्रकरणाचा निषेध करण्यासाठी कॉंग्रेसचे लोकसभेतील सदस्य काळ्या फिती लावून सभागृहात आले होते. त्याचबरोबर काही जणांनी याविरोधात कागदी फलकही सभागृहात आणले होते. त्यावरून हा सर्व प्रकार घडला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Speaker sumitra mahajans warning of disciplinary action irks opposition