जगातील सातवे आश्चर्य मानले जाणाऱ्या ताजमहालजवळ स्वयंपाकासाठी गोवऱ्या जाळण्यास बंदी घालण्यात आली आहे. गोवऱ्याच्या धुरामुळे ताजमहालवर पिवळसर पट्टे येऊ लागले आहेत.
 आग्रा जिल्हा प्रशासनाने लघु उद्योगांनी बांगडय़ा व स्थानिक मिठाई असलेला पेठा तयार करण्यासाठी कोळशाचा वापर करण्यासही बंदी घातली आहे. १७ व्या शतकात ताजमहाल बांधण्यात आला होता पण दिवसेंदिवस तो प्रदूषणाने खराब होत चालला आहे.
आगर्‍याचे विभागीय आयुक्त व ताजमहाल ट्रॅपेझियम झोनचे अध्यक्ष प्रदीप भटनागर यांनी सांगितले, की अमेरिकी नियतकालिकातील अभ्यासानुसार ताजमहालचे पांढरे संगमरवर पिवळे पडले असून त्यामुळे गोवऱ्या जाळण्यावर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी अमलात आणणे अवघड आहे असे सांगून ते म्हणाले, की नगर निगम कायद्यानुसार जे लोक या नियमाचे उल्लंघन करतील त्यांना दंड आकारण्यात येईल.
 गोवऱ्या न जाळण्याने गरिबांना स्वयंपाकच करता येणार नाही त्याबाबत विचारले असता भटनागर यांनी सांगितले, की त्यांना विशेष शिबिरे घेऊन एलपीजी जोड दिले जातील म्हणजे घरगुती गॅस उपलब्ध करून दिले जातील.
आगर्‍याचा पेठा प्रसिद्ध आहे. तो फिरोझाबाद व आजूबाजूच्या ठिकाणी तयार होतो. त्यासाठी कोळसा वापरला जातो. त्यावरही  नियंत्रण आणले जाईल. ४००० डिझेल ट्रक व टेम्पोजना जुलैपर्यंत सीएनजी वापरण्यास सांगण्यात आले आहे. पेठा व बांगडय़ा तयार करण्याचे काम आग्रा व फिरोझाबाद येथे चालते, त्यात कोळसा वापरल्याने काजळी तयार होते व त्यामुळे ताजमहालचे नुकसान होते. या बंदीमुळे ताजमहालची आणखी हानी होण्याचे टळेल असे भटनागर यांनी सांगितले. संसदेच्या पर्यावरण समितीनेही ताजमहालला प्रदूषणामुळे असलेल्या धोक्याची दखल घेतली असून जिल्हा प्रशासनाकडे माहिती मागितली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ताजमहालचे सौंदर्य वाचवण्यासाठी..
अमेरिकी संशोधनानुसार ताजमहाल पिवळा पडण्याची प्रक्रिया धोकादायक
कोळसा व गोवऱ्यांच्या धुरामुळे ताजमहालला धोका
वाहनात डिझेल वापरणे, स्वयंपाकासाठी, मिठाई बनवताना कोळसा व गोवऱ्या वापरण्यावर र्निबध
स्वयंपाकाचा गॅस व सीएनजी उपलब्ध करून देणार

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Steps to protect taj mahal from air pollution