भुवनेश्वर : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ओडिशाच्या किनारपट्टीजवळ वादळी पावसाने थैमान सुरू केले असून गजपती आणि गंजम जिल्ह्यात काही भागात भूस्खलन आणि झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. कोरापत जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील पूलही पाण्याखाली गेल्याने ओडिशा आणि आंध्र प्रदेश दरम्यान होणारी वाहतूक ठप्प झाली आहे. जगतसिंगपूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे दुर्गापूजेचा मंडप कोसळून दोन जण जखमी झाल्याची नोंद झाली आहे.
कमी दाबाच्या पट्ट्यामुळे देशाच्या पूर्व भागात पावसाचा जोर सध्या वाढतो आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने ओडिशाच्या किनारपट्टीवरील सात जिल्ह्यांत रेड अलर्ट, तर १६ जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी केला आहे. राज्याला गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी पावसाने झोडपून काढतानाच वाऱ्याने सकाळी सहा तास ताशी १८ किलोमीटर वेगाची नोंद केली.
या चक्रीवादळाचे केंद्र ओडिशातील गोपालपूरपासून ९० किमी समुद्रात आणि आंध्र प्रदेशातील कलिंगपटणमपासून १४० किमी अंतरावर आहे. हे केंद्र लवकरच ओडिशाच्या किनारपट्टी भागात येण्याची शक्यता असून या काळात पुरी, गंजम, गजपती, रायागडा, कोरापत, कलहंडी आणि कंधमल येथे २०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
तसेच मलकानगिरी, नवरंगपूर, बोलनगीर, सोनेपूर, बौध, अंगुल, धेनकनल, नयागड, खुर्द, जगतसिंगपूर, कटक, भद्रक, बालासोर, मयूरभंज, जजपूर आणि केंद्रपारा या जिल्ह्यांत ७० ते २०० मिमीपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य ओडिशासह किनारपट्टी भागात ताशी ५५-६५ किमी वेगाने वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या आपत्कालीन यंत्रणेमार्फत आपत्ती निवारणासाठी सर्व उपाययोजना करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
आंध्र, पश्चिम बंगाल, झारखंडलाही इशारा
आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल आणि झारखंड येथेही या वादळाचा मोठा फटका बसण्याची शक्यता असून ६ ऑक्टोबरपर्यंत येथील अनेक भागांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. आंध्रप्रदेशच्या श्रीकाकुलम, पार्वतीपूरम, मण्यम, विझीनगरम, विशाखापटणम आणि अनाकापल्ली या जिल्ह्यांना, तर पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा, पूर्व आणि पश्चिम मेदिनीपूर आणि झरग्राम या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. सध्या झारखंडमध्येही अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. येथील कोडेर्मा, चत्रा, हजारीबाग, दुमका, रांची या जिल्ह्यांत मागील २४ तासांत मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली आहे. ६ ऑक्टोबरपर्यंत वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी होण्याचा इशाराही देण्यात आला आहे.