Stray Dog Attack: भटक्या कुत्र्यांचा प्रश्न देशात गंभीर बनला असतानाच भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही येत आहेत. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गाजत असताना उत्तर प्रदेशच्या कानपूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील २१ वर्षीय विद्यार्थीनीच्या गालाचा चावा भटक्या कुत्र्यांनी घेतला. बीबीएच्या कोर्सला शिकणारी विद्यार्थीनी महाविद्यालयातून घरी येत असताना तिच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला.

या हल्ल्यात सदर विद्यार्थी गंभीर जखमी झाली असून डॉक्टरांनी तिच्या गालावर १७ टाके घातले आहेत. सदर घटना २० ऑगस्ट रोजी कानपूरच्या शान नगर परिसरात घडली. या परिसरात भटके कुत्रे आणि माकडांमध्ये संघर्ष सुरू होता. या दरम्यान तिथून जात असलेल्या वैष्णवी साहू नाम विद्यार्थीनीवर अचानक तीन कुत्र्यांनी हल्ला केला.

भटक्या कुत्र्यांनी वैष्णवीवर इतका जबर हल्ला केला की, ती जमिनीवर पडली. त्यानंतर कुत्र्यांनी तिचा चेहरा विद्रूप केला. तिचा उजवा गाल अशरक्षः फाटला. तर तिच्या नाकावर आणि शरीरावर इतर ठिकाणीही अनेक ठिकाणी कुत्र्यांनी चावे घेतले. तिने कुत्र्यांच्या तावडीतून निसटून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र कुत्र्यांनी तिचा पाठलाग करून पुन्हा हल्ला केला.

वैष्णवीचा आरडाओरडा ऐकून स्थानिकांनी काठ्या घेऊन त्याठिकाणी धाव घेतली आणि कुत्र्यांना पळवून लावले. मात्र तोपर्यंत वैष्णवीला खोलवर जखम झाली होती आणि ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिला कांशीराम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिच्या गालावर १७ टाके घातले आहेत.

वैष्णवीचे काका आशुतोष यांनी माध्यमांना माहिती दिली की, माझे भाऊ वीरेंद्र साहू हयात नाही. त्यांची मुलगी वैष्णवी बीबीएच्या अखेरच्या वर्षात शिकत आहे. ती महाविद्यालयातून येत असताना ही भयानक घटना घडली. तिला आता खायला आणि तोंड हलवालयलाही येत नाहीये. आम्ही तिला फक्त द्रव्य पदार्थ देत आहोत.

एक्सवरील काही संतप्त प्रतिक्रिया

कुठे गेले प्राणीमित्र, सोशल मीडियावर सवाल

सोशल मीडियावर या घटनेची आता चर्चा होऊ लागली आहे. अनेकांनी वैष्णवीचा फोटो शेअर केला असून आता कुठे गेले प्राणीमित्र असा सवाल उपस्थित केला आहे. प्राणी मित्र सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले. पण सामान्य माणसांना रस्त्यावर नाहक त्रास भोगावा लागतो, त्याचे काय? असाही प्रश्न आता विचारला जात आहे.

सोशल मीडियावरील प्रतिक्रिया
stray dog attack vaishnavi sahu

सरकारने कारवाई करावी, अशी मागणी वैष्णवी साहूच्या कुटुंबियांनी आता केली आहे. सरकारने या भटक्या कुत्र्यांचे काहीतरी करायला हवे. त्यांना एकतर पकडून घेऊन जा किंवा त्यांना कुठेतरी दुसरीकडे आश्रय द्यावा. पण त्यांना रस्त्यावरून हटवले गेले पाहिजे. अशी मागणी त्यांनी केली.