PM Modi visit of Brunei: पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्व आशियातला इवलासा देश असलेल्या ब्रुनेईला भेट देणार आहेत. ब्रुनेईचे सुलतान हाजी हस्सानल बोलकिया यांच्या निमंत्रणानंतर भेट देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत. दोन दिवसांच्या या दौऱ्यात दोन्ही देशांचे द्विपक्षीय संबंध आणखी दृढ करण्यावर चर्चा होणार आहे. तसेच दोन्ही देशांच्या ४० वर्षांच्या द्विपक्षीय धोरणात्मक संबंधाच्या स्मरणार्थ कार्यक्रम घेतला जाणार आहे. ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यानंतर सुलतान हाजी हस्सानल बोलकिया हे सर्वाधिक काळ गादीवर बसलेले राजे आहेत.

सुलतान हस्सानल बोलकिया यांचा उल्लेख राजेशाही थाटात आलिशान जीवनशैली जगणाऱ्या नेत्यांमध्ये होते. प्रचंड उधळपट्टी करत त्यांनी अलिखान गाड्यांचा ताफा गोळा केला आहे. यासाठी त्यांनी पाच अब्ज डॉलर खर्च केले आहेत. ब्रुनेईच्या ऑईल अँड गॅस साठ्यांमधून सुलतान हस्सानल बोलकिया यांना उत्पन्न मिळते. त्यांची एकूण संपत्ती ३० अब्ज डॉलर इतकी आहे. सुलतान यांच्याकडे ७००० आलिशान गाड्या आहेत. यापैकी ६०० तर रोल्स रॉयस कंपनीच्या गाड्या आहेत. इतक्या गाड्या बाळगल्याबद्दल त्यांची नोंद गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे.

हे वाचा >> ब्रुनेईची सुलतानी

सनने दिलेल्या बातमीनुसार, सुलतान हस्सानल बोलकिया यांच्या ताफ्यात ४५० फेरारी, ३५० बेंटली कार आहेत. यासोबतच पोर्श, लॅम्बोर्गिनी, मेयबॅक, जॅग्वॉर, बीएमडब्लू आणि मॅलारेन अशा इतर कारही असल्याची माहिती कारबझ आणि द साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिली आहे.

हस्सानल बोलकिया यांच्या ताफ्यातील बेंटली डॉमिनेटर एसयूव्ही सर्वात महागडी कार आहे. ज्याची किंमत ८० दशलक्ष डॉलर इतकी आहे. याबरोबर एक पोर्श ९११ गाडी आहे. तर सोन्याचा वर्ख लावलेली रोल्स रॉयस गाडी आहे. एका रोल्स रॉयस गाडीला सोन्याचा वर्ख लावला असून गाडीच्या छतावर एक छत्री आणि बसायला ऐसपैस जागा केली आहे. ज्यातून राजेशाही थाट दिसून येतो.

सुलतान बोलकिया यांची संपत्ती फक्त गाड्यांच्या ताफ्यांपर्यंत मर्यादीत नाही. तर त्यांच्या इस्ताना नुरुल इमाम महालाचीही गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये नोंद झालेली आहे. जगातील सर्वात मोठा महाल म्हणून याला ओळखले जाते. दोन दशलक्ष स्क्वेअर फुटाचे बांधकाम असलेल्या या महालात ५ स्विमिंग पूल, १,७०० बेडरूम्स, २५७ बाथरुम आणि ११० गॅरेज आहेत. सुलतानचे स्वतःचे प्राणीसंग्रहालय आहे. ज्यामध्ये ३० बंगाली वाघ आहेत. अनेक प्रकारच्या प्रजातीचे पक्षी आहेत. त्यांच्याकडे बोईंग ७४७ विमानदेखील आहे.