पीटीआय, अहमदाबाद : गेल्याच आठवडय़ात सुरू झालेल्या ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसने गुरुवारी सकाळी गुजरातमध्ये वाटवा व गैतापूरदरम्यान म्हशींच्या कळपाला धडक दिली. या अपघातात गाडीच्या इंजिनचे आणि पुढील भागाचे नुकसान झाले आहे. मुंबई सेंट्रल ते गांधीनगर या दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचे ३० सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकार्पण केले. अतिवेगवान धावणारी ही एक्स्प्रेस गुरुवारी सकाळी मुंबई सेंट्रल येथून सुटली. सकाळी ११.१५ वाजता गैतापूर आणि वाटवा या स्थानकांदरम्यान रुळांवर आलेल्या म्हशींच्या कळपाला या एक्स्प्रेसने जोरदार धडक दिली. त्यामुळे एक्स्प्रेसच्या इंजिनच्या पुढील भागाचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. नुकसान झालेला भाग दुरुस्त करून ही गाडी गांधीनगर स्थानकात आणण्यात आली. या अपघातात कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे प्रवक्ते जितेंद्र कुमार यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, रेल्वे रुळांजवळ गुरे चरण्यास नेऊ नये यासाठी स्थानिक ग्रामस्थांचे समुपदेशन करण्यात येणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ ही मुंबई ते अहमदाबाददरम्यान धावणारी सेमी अतिवेगवान रेल्वे आहे. ही रेल्वे २०० किलोमीटर प्रतितास वेगाने धावते. यामुळे अहमदाबाद ते मुंबई हा प्रवास प्रवाशांसाठी सुकर ठरत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Super fast running express vande bharat express hit a buffalo ysh