सध्या व्हॉट्स अॅप आणि फेसबुकच्या विविध ग्रुपवर एक संदेश फिरतो आहे. या संदेशाला नेटिझन्सकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. खरे तर हा संदेश नसून भारतीयांना केलेले हे आवाहन आहे.
हिज्बुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानीला जवानांनी ठार केल्यानंतर काश्मीरमध्ये अशांततेचे वातावरण आहे. त्यातच पाकिस्तानी सरकारने १९ जुलै हा दिवस पाकव्याप्त काश्मीरमध्ये ‘काळा दिवस’ म्हणून पाळण्यात येणार असल्याचे जाहीर करून आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला.
पण पाकच्या या चीड आणणाऱ्या घोषणेला चोख उत्तर देण्यासाठी आता भारतीय पुढे आले आहेत. १९ जुलै हा दिवस पाकिस्तानने ‘काळा दिवस’ म्हणून पाळण्याचे जाहीर केले असले तरी भारतीयांनी पुढचे २४ तास तरी आपला फेसबुक आणि व्हॉट्स अॅपचा प्रोफाईल पिक्चर बदलून त्याजागी भारतीय सेनाचा फोटो ठेवावा, असे आवाहन करणारा संदेश व्हॉट्स अॅपवर फिरतो आहे. भारतातील मोठा वर्ग हा व्हॉट्स अॅप आणि फेसबुकवर अँक्टिव्ह असतो. हे दोन्ही वापरणाऱ्यांची संख्या भारतात अधिक आहे तेव्हा सगळ्यांनी फोटो बदलून भारतीय सेनेला पाठिंबा देण्याचे आवाहन या संदेशातून करण्यात आले आहे.
गेल्याच वर्षी तिरंग्याचा देखील व्हॉट्स अॅपमध्ये समावेश व्हावा यासाठी संदेशाच्या माध्यामातून मोठी चळवळ नेटिझन्सने सुरू केली होती. या संदेशाची दखल घेत व्हॉट्स अॅपमध्ये तिरंग्याचा समावेश करण्यात आला होता.