Supreme Court rejects plea to restore blocked WhatsApp account advise to use Arattai app : एका महिला डॉक्टरचे ब्लॉक केलेले अकाऊंट अनब्लॉक करण्याचे व्हॉट्सअ‍ॅप कंपनीला निर्देश देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. विशेष म्हणजे, या वेळी न्यायालयाने त्या महिलेला त्याऐवजी भारतीय बनावटीचे मेसेजिंग अ‍ॅप ‘अराताई (Arattai)’ वापरण्याचा सल्ला दिला आहे. व्हॉट्सअॅप अकाउंट ब्लॉक केल्याने आपल्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाल्याचा दावा महिला डॉक्टरकडून करण्यात आला होता.

नेमकं काय झालं?

वरिष्ठ वकील महालक्ष्मी पावनी यांनी याचिकाकर्त्या रमण कुंद्रा यांच्या वतीने न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठापुढे बाजू मांडताना १० ऑक्टोबर रोजी सांगितले की, व्हॉट्सअपच्या मनमानी कारवाईमुळे त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाले आहे.

त्याच्या याचिकेमध्ये म्हटले आहे की, “१३ सप्टेंबर २०२५ च्या संध्याकाळी त्यांचे खाते ब्लॉक करण्यात आले. त्यांनी रिव्ह्यूवची मागणी केल्यानंतर, १४ सप्टेंबर २०२५ च्या संध्याकाळी त्यांना कळवण्यात आले की खाते ब्लॉकच ठेवले जाईल.”

यावेळी न्यायमूर्ती मेहता यांनी वरिष्ठ वकिलांना विचारले, “तुमचा व्हॉट्सअ‍ॅप वापरण्याचा मूलभूत अधिकार काय आहे?” न्यायमूर्ती नाथ म्हणाले, “इतरही कम्युनिकेशन ॲप्लिकेशन्स आहेत,” जसे की अराताई, जे त्या वापरू शकतात. न्यायमूर्ती नाथ पुढे म्हणाले, “अराताई नावाचे एक ॲप आहे… ते वापरा,” आणि हे भारतात बनवलेले असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

अराताई काय आहे?

श्रीधर वेम्बू यांच्या झोहो कॉर्पोरेशनने विकसित केलेले इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप अराताई व्हॉट्सअ‍ॅपला जोरदार टक्कर देत आहे. व्हॉट्सअ‍ॅपचा मेड इन इंडिया पर्याय असलेले हे अ‍ॅप, प्ले स्टोअर आणि अ‍ॅप स्टोअरवरील सोशल नेटवर्किंग श्रेणीत टॉपवर असल्याचे पाहायला मिळत आहे.
अराताईमध्ये वन-टू-वन आणि ग्रुप चॅट, व्हॉइस नोट्स, मीडिया शेअरिंग, व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल, स्टोरीज आणि चॅनल ब्रॉडकास्टिंग यासारखी फिचर्स आहेत. हे डेस्कटॉप आणि अँड्रॉइड टीव्ही सह अनेक उपकरणांवर देखील वापरता येते.