पीटीआय, नवी दिल्ली : एक हुद्दा एक निवृत्तीवेतन (वन रँक वन पेन्शन) योजनेअंतर्गत संरक्षण दलाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे थकित निवृत्तीवेतन देण्यास विलंब होत असल्याच्या मुद्दय़ावरून संतप्त सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी संरक्षण दलाला फटकारले. ही थकबाकी कशी द्यावी याबाबत न्यायालयाचे आदेश डावलून संरक्षण दलाने एकतर्फी निर्णय जाहीर केल्यामुळे संतप्त न्यायालयाने खात्याच्या सचिवांना वैयक्तिक प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचा आदेश दिला. निवृत्त कर्मचाऱ्यांना १५ मार्चपर्यंत थकबाकी दिली नाही तर त्यांना ९ टक्के दराने व्याज द्यावे लागेल असा इशाराही न्यायालयाने दिला.
या योजनेअंतर्गत संरक्षण दलाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना थकबाकी देण्यासाठी वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली आहे. अखेर, १५ मार्च २०२३ पर्यंत थकबाकी पूर्णपणे चुकती केली जावी असे निर्देश न्यायालयाने जानेवारी महिन्यात दिले होते. मात्र, ही थकबाकी दर तीन महिन्यांनी चार हप्तय़ांमध्ये देण्याचे निर्णय केंद्र सरकारने परस्पर घेतला आणि २० जानेवारीला तसे पत्रही जारी केले. त्यावर, वैयक्तिक प्रतिज्ञापत्र सादर करून या निर्णयाचा खुलासा करा किंवा हा निर्णय मागे घ्या असे सरन्यायाधीश न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. पी एस नरसिंहा आणि न्या. जे बी पारडीवाला यांच्या खंडपीठाने संरक्षण सचिवांना सुनावले. हे युद्ध नाही, कायद्याचे राज्य आहे.
तुमचा कारभार सुधारा, अन्यथा आम्ही संरक्षण मंत्रालयाला अवमान नोटीस बजावू असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी बजावले. त्यावर न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी मंत्रालयाला वेळ द्यावा अशी विनंती अतिरिक्त महाधिवक्ता एन वेंकटरामन यांनी केली. पुढील सुनावणी होळीच्या सुट्टीनंतर होणार आहे. केंद्राने ७ मार्च २०१५ रोजी एक अधिसूचना काढून एक हुद्दा एक पेन्शन योजना सुरू केली होती. ती सर्वोच्च न्यायालयाने उचलून धरली आणि या धोरणामध्ये नमूद केल्याप्रमाणे संरक्षण दलाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना ५ वर्षांच्या कालावधीमध्ये थकबाकी दिली जावी असे सांगितले होते.
‘न्यायालयाचा निर्णय संरक्षण खाते बदलू शकते का?’
ज्येष्ठ वकील हुझेफा अहमदी यांनी निवृत्त कर्मचाऱ्यांची बाजू मांडली. संरक्षण खाते सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय कसा बदलू शकते असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच या दरम्यान ४ लाख निवृत्ती वेतनधारकांचा मृत्यू झाला असून ते त्यांच्या निवृत्ती वेतनाचा दावा करू शकत नाहीत याकडे त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.