स्टॉकहोम : आधुनिक मनुष्याच्या रोगप्रतिकारक प्रणालीचे अत्यंत महत्त्वाचे अंतरंग समजून घेण्याबरोबरच त्याला त्याच्या नामशेष झालेल्या पूर्वजाच्या तुलनेत विलक्षण बनवणाऱ्या मानवी उत्क्रांतीतील शोधाबद्दल स्वीडिश शास्त्रज्ञ स्वान्ते पाबो यांना सोमवारी वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाबो यांनी विकसित केलेल्या तंत्रांमुळे संशोधकांना आधुनिक मानव आणि ‘निअँडरथल्स’ व ‘डेनिसोव्हन्स’ या दोन नष्ट झालेल्या मानवी प्रजातींच्या जनुकाचा तुलनात्मक अभ्यास करता आला, असे नोबेल समितीने म्हटले आहे. ‘निअँडरथल्स’ ही मानवाची एक स्वतंत्र प्रजाती होती. ४० हजार वर्षांपूर्वी नामशेष होईपर्यंत ती हजारो वर्षांपासून युरोपमध्ये अस्तित्वात होती. ‘‘नामशेष झालेल्या आपल्या पूर्वजांपैकी एकाचा म्हणजे ‘निअँडरथल्स’चा आनुवंशिक ‘कोडं’ उलगडण्याचे अशक्यप्राय कार्य पाबो यांनी केले. त्यांच्या कार्याने मानवी उत्क्रांतीचा इतिहास आणि मानव पृथ्वीतलावर कसा भ्रमण करीत गेला, हे शोधण्यातही मदत झाली, अशा शब्दांत नोबेल समितीने पाबो यांचा गौरव केला. पाबो आणि त्यांच्या संशोधकांच्या पथकाला हेही आढळले की, जनुकांचा प्रवास निअँडरथल्सपासून होमो सेपियन्सपर्यंत झाला होता. तसेच या दोन्ही प्रजातींच्या सहअस्तित्वाच्या काळात त्यांना एकमेकांपासून मुलेही झाली होती, असे पाबो यांच्या संशोधनातील निष्कर्ष असल्याचे नोबेल समितीच्या अध्यक्ष अ‍ॅना वेडेल यांनी सांगितले. होमिनिन प्रजातींमधील जनुकांचे हे हस्तांतरण करोना विषाणूसारख्या संसर्गानंतर आधुनिक मानवाची प्रतिकार प्रणाली कशी काम करते, हेही दाखवता येते, असेही नोबेल समितीने म्हटले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sweden scientist svante paabo wins 2022 nobel prize in medicine zws
First published on: 04-10-2022 at 02:05 IST