भारत आपली एक इंच भूमीही कोणाला घेऊ देणार नाही, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी, आज संसदेत सांगितले. लडाखमध्ये चीन बरोबर सुरु असलेल्या सीमावादाच्या विषयावर ते बोलत होते. पँगाँग टीसओ सरोवराच्या भागातून सैन्य मागे घेण्याबाबत चीन बरोबर सहमती झाल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी संसदेला दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पँगाँग सरोवराच्या भागातील सैन्य तैनाती मुख्य कळीचा मुद्दा आहे. चीनने इथे फिंगर फोरपर्यंत सैन्य तैनात केल्याने वाद चिघळत गेला. “चीन बरोबर सतत सुरु असलेल्या चर्चेतून पँगाँग सरोवराच्या उत्तर आणि पूर्व किनाऱ्यावरुन सैन्य माघारीवर सहमती झाली आहे. टप्याटप्याने आणि समन्वय साधून भारत-चीन फॉरवर्ड भागातून सैन्य मागे घेईल” असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

“चीनचे अयोग्य दावे भारताने कधीच मान्य केलेले नाहीत तसेच दोन्ही बाजुंनी प्रयत्न केले तरच द्विपक्षीय संबंध राखले जातील” असे भारताने नेहमीच म्हटले आहे. “पाकिस्तानने बेकायदपणे भारताची भूमी चीनला दिली. त्याला आम्ही कधीच मान्यता देणार नाही. चीनने भारताच्या मोठया भूभागावर दावा सांगितला आहे. पण आम्ही त्यांचे हे अयोग्य दावे कधीच मान्य केले नाहीत” असे राजनाथ सिंह म्हणाले.

“लडाखमध्येही चीनने एकतर्फी चाल केली. भारत आपल्या सार्वभौमत्वाचं रक्षण करण्यास समर्थ आहे. कराराचे उल्लंघन करुन चीनने नियंत्रण रेषेवर मोठया संख्येने सैन्य तैनाती केली, त्यावेळी भारताने सुद्धा आपल्या हिताच्या दृष्टीने तशीच भूमिका घेत मोठया प्रमाणावर सैन्य तैनात केले” असे राजनाथ सिंह संसदेत म्हणाले.

“पँगाँग सरोवराच्या परिसरातून दोन्ही देशांचे सैन्य पूर्णपणे माघारी फिरल्यानंतर ४८ तासांनी दोन्ही देशांच्या वरिष्ठ सैन्य कमांडर्समध्ये बैठक होईल. अन्य मुद्यांवर तोडगा काढण्यासाठी या बैठकीत चर्चा होईल” असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

“पँगाँग सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावरील फिंगर आठच्या पूर्व दिशेला चीन आपले सैनिक तैनात करेल, भारत फिंगर तीनपर्यंत सैन्याची तैनाती करेल” असे राजनाथ सिंह म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Talks led to disengagement at pangong banks rajnath dmp