Hina Khan Chants Jai Shri Ram Video Viral: ग्वाल्हेरच्या फूलबाग परिसरात पोलीस आणि स्थानिकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. फूलबाग परिसरात स्थानिक वकील अनिल मिश्रा यांच्या वाढदिवसानिमित्ता सुंदरकांडचे आयोजन करण्यात आले होते. मात्र वरिष्ठ पोलीस अधिकारी हिना खान यांनी सदर कार्यक्रम नियमबाह्य असल्याचे सांगून कार्यक्रम न घेण्याची विनंती केली. यावेळी स्थानिक आणि पोलीस यात वाद झाल्यानंतर पोलीस हिना खान यांनी जय श्री रामचे नारे दिले.

ग्वाल्हेर परिसरात आधीच तणावाचे वातावरण आहे. मध्यप्रदेश उच्च न्यायालय परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसविण्यावरून वाद सुरू आहे. यामुळे सोमवारी सायंकाळी भारतीय न्याय संहितेच्या कलम १६३ लागू करण्यात आले होते. संचारबंदी असल्यामुळे चार हजार पोलीस तैनात करण्यात आले होते.

अनिल मिश्रा यांना कार्यक्रम घेण्यापासून रोखले

ग्वाल्हेरच्या बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष वकील अनिल मिश्रा यांनी फूलबाग परिसरात सुंदरकांडचे पठन आयोजित केले होते. वरिष्ठ पोलीस अधिकारी हिना खान यांनी याला परवानगी नाकारली. तसेच सदर कार्यक्रम घेऊ नये, अशी विनंती केली. मात्र नाराज झालेल्या मिश्रा यांनी कार्यक्रम घेऊच असे सांगितले. तसेच हिना खान सनातन विरोधी असल्याचे म्हटले. यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी जय श्री रामचे नारे दिले.

वातावरणात तणाव निर्माण होईल, अशी शक्यता दिसत असतानाच पोलीस अधिकारी हिना खान यांनीही जय श्री रामचे नारे दिले. या नारेबाजीनंतर जमाव काही क्षण थबकला. त्यांना काहीच समजले नाही. त्यानंतर शांत झालेल्या जमावाला हिना खान यांनी कायद्याचे पालन करण्याचे आवाहन केले. मीही आता जय श्री रामचे नारे दिले आहेत, आता पुढे काय? असे सांगून त्यांनी कार्यकर्त्यांना निरुत्तर केले.