दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी हवाई वाहतूक नियंत्रण यंत्रणेत (एटीसी) तांत्रिक अडथळा उद्भवला. यामुळे ८००हून अधिक देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय विमानांना उशीर झाला, अशी माहिती सूत्रांनी दिली. या तांत्रिक समस्येचा फटका सर्व विमान कंपन्यांना आणि त्यांच्या प्रवाशांना बसला. दरम्यान, संध्याकाळी ही समस्या सोडवण्यात यश आल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) दिली.
‘एटीसी’ डेटाला सहाय्य करणाऱ्या ‘ऑटोमॅटिक मेसेज स्विचिंग सिस्टम’मधील (एएमएसएस) तांत्रिक अडथळ्यामुळे दिवसभरात दिल्लीतून किमान २० विमान उड्डाणे रद्द करण्यात आली. त्याबरोबरच दिवसभरात इंडिगो, एअर इंडिया, एअर इंडिया एक्स्प्रेस, स्पाइसजेट आणि आकासा एअर या कंपन्यांच्या विमानांना उशीर झाल्यामुळे प्रवाशांना रखडावे लागले.
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील सर्वात वर्दळीचे विमानतळ आहे. येथे दिवसभरात १,५००हून अधिक विमाने उड्डाण करतात आणि उतरतात. संध्याकाळी ‘एएमएसएस’ची समस्या सोडवण्यात यश आल्याचे ‘एएआय’कडून सांगण्यात आले. मात्र, सेवा सुरळीत होण्यास काहीसा वेळ लागेल अशी माहिती देण्यात आली. ही तांत्रिक समस्या दूर करण्यासाठी ‘इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड’चे अधिकारी हैदराबादून दिल्लीला गेले. या समस्येचे कारण शोधण्यासाठी चौकशी केली जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली.
अमेरिकेतील शटडाऊनचा विमान सेवेवर परिणाम
वॉशिंग्टन : अमेरिकेत शुक्रवारी फेडरल हवाई प्रशासनाने (एफएए) देशभरातील विमानांच्या उड्डाणांमध्ये कपात करण्याचे आदेश दिले. त्यामुळे तेथील विमान सेवेवर विपरित परिणाम झाला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरात शेकडो विमाने रद्द करण्यात आली. अमेरिकेतील शटडाऊन अजूनही सुरू असून त्याने विक्रमी कालावधी गाठला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून हे अभूतपूर्व आदेश देण्यात आले. विमान कंपन्यांना गुरुवारीच ‘एफएए’च्या अधिकृत आदेशाची कल्पना आल्यामुळे त्यांनी त्याप्रमाणे विमानांच्या वेळा बदलण्यास आणि काही विमाने रद्द करण्यास सुरुवात केली होती.
