telangana chief minister boycotts niti aayog meeting zws 70

हैदराबाद : केंद्र सरकारच्या राज्यांबाबतच्या भेदभावपूर्ण धोरणाच्या निषेधार्थ निती आयोगाच्या नियामक परिषदेच्या सातव्या बैठकीवर आपण बहिष्कार घालणार असल्याचे तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कळविले आहे. ही बैठक ७ ऑगस्ट रोजी होणार आहे. राव यांनी मोदी यांना याबाबत कठोर भाषेत पत्र लिहिले असून त्यात म्हटले आहे की, जर राज्यांचा विकास झाला, तरच देश समर्थ होऊ शकतो. राज्ये मजबूत होऊन आर्थिकदृष्टय़ा संपन्न झाली, तरच देश बलवान होऊ शकतो, असे त्यांनी म्हटले आहे. हे लक्षात घेता निती आयोगाच्या आगामी बैठकीला उपस्थित राहण्यात मला काही अर्थ वाटत नाही. देशाचा विकास करण्यासाठीच्या सामूहिक प्रयत्नांत राज्यांना बरोबरीचे भागीदार न मानण्याची तसेच राज्यांबाबत समभाव न ठेवण्याची केंद्र सरकारची सध्याची वृत्ती पाहता तिच्या निषेधार्थ आपण हे पाऊल उचलत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.